बीकेसी कोविड सेंटरला दोन वर्ष पूर्ण
@maharashtracity
मुंबई: मुंबईतील सर्वात मोठ्या बीकेसी कोविड केंद्राला (BKC jumbo covid centre) १९ मे रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने (BMC) गुरुवारी वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जंबो कोविड सेंटरचा स्थापना दिन साजरा केला. यावेळी कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
कोविड महामारी काळात ज्यांनी बहुमुल्य योगदान दिले अशांचा कोरोना योद्धा (corona fighters) म्हणून सन्मान करण्यात आला. या कोविड केंद्रात सुमारे १२ टक्के मुंबई बाहेरील रूग्ण उपचार घेऊन गेले. चौथी लाट असल्यास आजही आम्ही तेवढेच तत्पर असल्याचे बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भारतातील सर्वात मोठ्या जंबो कोविड केंद्राच्या निर्मितीपासून रुग्णसेवापर्यंतचा प्रवास माहितीपटातून मांडण्यात आला. तसेच अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. बीकेसी कोविड केंद्रात गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत २९ हजार कोरोना रुग्णांना (corona patients) दाखल करुन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील २५ हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले.
दरम्यानच्या काळात कमीत कमी मृत्यूदर ठेवण्यावर बीकेसी कोविड केंद्राने भर दिला होता. तसंच, एकूण २५०० रुग्णांना डायलिसीसची (dialysis) सुविधा दिली. आतापर्यंत एकूण ५ लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली.
गेल्या दोन वर्षाचा कालावधी आव्हानात्मक होता. पालिकेने बीकेसीला खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. आता बीकेसी कोविड केंद्रात एकही रुग्ण दाखल नसून आता सध्या रूग्ण दाखल करून घेणे बंद आहेत. बीकेसीत जवळपास १२ टक्के रुग्ण हे मुंबईच्या बाहेरील होते ज्यांच्यावर इथे यशस्वी उपचार केले गेले. सोलापूर, कोल्हापूर, पुणे, पोलादपूर, नाशिक, उस्मानाबाद अशा ठिकाणांहून दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण दाखल झाले असल्याचे डॉ. डेरे म्हणाले.
कोरोना योद्धयांशी बातचीत
कल्याण येथे राहणाऱ्या संगीता लाल या नानावटी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. तर चेंबूर येथील राहणाऱ्या रिंकू बनसोडे या सुराना हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होत्या. बीकेसी कोविड सेंटरमध्ये संगीता आणि रिंकू या दोन्ही परिचारिका कोविड रुग्णसेवेसाठी रुजू झाल्या.
रुग्णसेवा करत असताना दोन वर्षाच्या कालावधीत त्यांचे कुटुंबिय कोरोना पॉझिटिव्ह झाले. मात्र या दोघी अद्याप कोरोना निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. यातील रिंकू बनसोडे यांच्या काकीचे कोरोनामुळे केईएम रुग्णालयात निधन झाले. काकीचा मृतदेह ताब्यात घेण्यापर्यंतचे काम रिंकू यांनी जवळून केले. त्यामुळे काकीचे निधन मनाला चटका लावून गेल्याचे रिंकू म्हणाल्या.