आयुक्तांचे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला आदेश
मार्च २०२३ अखेरपर्यंत संपूर्ण मुंबईतील सौंदर्यीकरण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी लांबली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner I S Chahal) यांनी, मुंबईतील सौंदर्यीकरणाची ५० टक्के कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा प्राथमिक आराखडा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत आयुक्त डॉ. चहल यांनी सादर केला होता.
मुंबईची प्रतिमा उंचावण्यासाठी संपूर्ण महानगराच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प (Beautification projects) पालिकेने हाती घेतला आहे. रस्ते, पूल, पदपथ, वाहतूक बेटे, समुद्रकिनारे, उद्याने इत्यादी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, सुधारणा, सुशोभित हरितीकरण, आकर्षक प्रकाशयोजना अशी कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत.
अनधिकृत केबल, तारा हटविणार
संपूर्ण मुंबईत ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत केबल, तारा लटकलेल्या/ हवेत तरंगताना आढळतील, त्या सर्व तातडीने काढून टाकाव्यात, असे आदेश पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईतील सौंदर्यीकरणाची कामे
मुंबईत रस्ते वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी पावसाळा संपताच रस्त्यांचे पुनर्पृष्टीकरण, दुरुस्ती हाती घेण्यात यावीत. प्रत्येक विभाग कार्यालयाच्या स्तरावर किमान १५ किलोमीटर लांबीच्या पदपथांची सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात यावे. त्यात स्टॅम्प काँक्रिट, आकर्षक विद्युत दिवे, अतिरिक्त जागेत शोभिवंत कुंड्या अशा बाबींचा समावेश करून उत्कृष्ट पदपथांची निर्मिती करण्यात येणार आहे. पदपथांवर जिथे शक्य आहे तिथे नाविन्यपूर्ण, कलापूर्ण व परिसर सौंदर्य वाढविणारी आसने लावणे, प्रमुख रस्त्यावरील पथदिव्यांचे सुशोभीकरण करून विद्युत खांबांना प्रकाश योजना करण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईतील स्कायवॉकचे सुशोभीकरण करून नागरिकांना रात्रीच्या वेळी त्याचा वापर करता आला पाहिजे, या दृष्टीने स्कायवॉकची स्वच्छता, रंगरंगोटी आणि विद्युत योजनेची कामे करण्यात येणार आहेत.
झोपडपट्टी व तत्सम परिसरांमध्ये राहणारे नागरिक यांच्या सोयीसाठी सुविधा केंद्र उभारावीत. यामध्ये स्वच्छ आणि दुर्गंधी मुक्त प्रसाधनगृह, गरम व थंड पाण्याच्या सुविधेसह स्नानगृह, पिण्याचे शुद्ध पाणी, सौर ऊर्जा पुरवठा अशा सुविधांचा समावेश करून ही केंद्र बांधण्यात यावीत, असे आदेश आयुक्त यांनी दिले आहेत. वाहतूक बेटे, समुद्र किनारे व उद्याने आदींची कामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
मुंबईत लवकरच डिजिटल जाहिरात फलक
मुंबईतील सर्व अधिकृत जाहिरात फलक येत्या ६ महिन्यात टप्प्याटप्प्याने डिजिटल जाहिरात फलकांमध्ये रूपांतरित करण्यात यावेत. प्रामुख्याने पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांवरील सर्व जाहिरात फलक १०० टक्के डिजिटल करण्यात यावेत. डिजिटल जाहिरात फलक कमी वेळेमध्ये बदलता येतात आणि अधिक आकर्षक असल्याने अधिक उत्पन्न देणारे ठरतात. त्यासाठी नवीन जाहिरात धोरण लवकर तयार करावे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईतील किल्ल्यांवर विद्युत रोषणाई करण्यात यावी.
भारताचे प्रवेशद्वार (गेटवे ऑफ इंडिया) परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात यावे.
मियावाकी पद्धतीने १ लाख वृक्ष लागवड याच पद्धतीने करण्यात यावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.