पालिकेकडून आतापर्यंत ५,३२१ कोटींची आर्थिक मदत

खर्चाचा अहवाल तीन महिन्यांत सादर करणे अनिवार्य

@maharashtracity

मुंबई: मागील काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांनी तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाला (BEST&T Undertaking) आतापर्यंत मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत देण्यात आली आहे. आता बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅजुटीसह कोट्यवधी रुपयांची थकीत देणी चुकती करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून (BMC) पुन्हा एकदा ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या ३,५१६ निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमास आतापर्यंत ५,३२१ कोटी रूपयांची आर्थिक मदत केली आहे.

मात्र, पालिकेने बेस्टला आता देऊ केलेल्या ४५० कोटींच्या या आर्थिक मदतीचा वापर कुठे व कसा कसा केला याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत सादर पालिकेला बेस्टने सादर करणे बंधनकारक असणार आहे.

बेस्ट उपक्रमाच्या विद्युत व परिवहन विभागात मिळून ४२ हजार कर्मचारी कार्यरत होते. मात्र, काही वर्षातच १३ हजार कर्मचारी नियत सेवकाल संपल्याने बेस्टच्या सेवेतून निवृत्त झाले. त्यामुळे सध्या बेस्ट उपक्रमात २९ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र मागील काही वर्षात बेस्टच्या तोट्यात झपाट्याने वाढ होत गेली आहे. त्यामुळे बेस्टला आपल्या निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यासाठीही आवश्यक रक्कम तिजोरीत नाही.

त्यामुळे बेस्टने मुंबई महापालिकेकडे आर्थिक साहाय्य देण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापालिकेने बेस्टला पुन्हा एकदा ४५० कोटी रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध केली आहे.

सन २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत बेस्ट उपक्रमातून ३,५१६ कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची
ग्रॅजुटीसह कोट्यवधी रुपयांची थकीत देणी चुकती करण्यासाठी बेस्ट उपक्रमाकडे पैसे नाहीत. त्यामुळे बेस्टने मुंबई महापालिकेकडे ४५० कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य मागितले होते. त्यानुसार प्रस्तावाला प्रशासकीय अधिकारी म्हणून पालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल (Dr Iqbal Singh Chahal) यांनी मंजुरी दिली आहे. पालिकेच्या आर्थिक मदतीमुळे बेस्ट उपक्रमातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना विविध देणी लवकरच मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here