मे महिन्यात ३.६८ लाख पर्यटकांची भेट
@maharashtracity
मुंबई: राणीच्या बागेने कात टाकल्यापासून आणि राणीच्या बागेत पेंग्विन व इतर प्राणी, पक्षी यांचे आगमन झाल्यापासून पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राणी बागेच्या दरमहा उत्पन्नात मोठी वाढ होत आहे. राणीच्या बागेत १ ते २९ मे या कालावधीत (दर बुधवारी सुट्टी) म्हणजेच २५ दिवसात तब्बल ३ लाख ६८ हजार ७२९ पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे पालिकेला तब्बल १ कोटी ४२ लाख ६८ हजार ५८० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
यासंदर्भातील माहिती राणी बाग प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्यांनी राणी बागेचे आधुनिकीकरण करून तिचे रूपांतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झू पार्कमध्ये करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार गेल्या काही वर्षात राणी बागेत अनेक आधुनिक विकास कामे करण्यात आली.
विदेशातून थंड प्रदेशात राहणाऱ्या ८ पेंग्विन पक्षाची आयात करण्यात आली. दुर्दैवाने एका पेंग्विन पक्षाचा संसर्ग झाल्याने मृत्यू झाला. मात्र त्यानंतर उर्वरित पेंग्विनची कडक देखभाल करण्यात येत आहे. त्यांची तज्ज्ञांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, राणीच्या बागेत, वाघ, बिबट्या, इतर प्राणी व विविध पक्षी आणण्यात आले.
राणी बागेत दोन सभागृह बनविण्यात आले.
उद्याने बनविण्यात आली. तिकीट दरातही वाढ करण्यात आली. परिणामी राणीच्या बागेत दररोज किमान सरासरी १४ हजार तर रविवारी सुट्टीच्या दिवशी किमान २० हजार पर्यटक येत आहेत. त्यामुळे राणी बागेला दररोज ५ – ६ लाख रुपये तर कधी कधी १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. २८ मे शनिवारी सुट्टीच्या दिवशी एका दिवसात राणी बागेला ८.३४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर २९ मे रोजी ३० हजार ३७९ पर्यटकांनी राणी बागेला भेट दिली. त्यामुळे राणी बागेला १० लाख ८४ हजार ७४५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.