@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पथकाने १० ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ९,३२९ दुकानांची झाडाझडती घेतली तसेच, दुकाने, हॉटेल्स आदींवर मराठी भाषेत व ठळक मोठ्या अक्षरात नामफलक न लावणाऱ्या म्हणजे पाट्याटाकू २,६७२ दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत.

त्यामुळे आता या दुकानदारांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार, असे पालिकेच्या दुकान व अस्थापने विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई महापालिकेने दुकानदारांना मराठी भाषेत व ठळक अक्षरात नामफलक लावण्यासाठी आता पर्यन्त तीन वेळा मुदत दिली होती. शेवटची मुदत ३० सप्टेंबरपर्यन्त होती. मात्र मुंबईतील पाच लाख दुकांदारांनापैकी ७९ टक्के दुकानदारांनीच दुकानांवर मराठी भाषेत व ठळक मोठ्या अक्षरात नामफलक लिहिले आहेत. मात्र उर्वरित २१ टक्के दुकानदारांनी अद्यापही मराठी भाषेत व ठळक मोठ्या अक्षरात नामफलक लिहिलेले नाहीत. त्यामुळे आता पालिकेने या ‘पाट्याटाकू’ दुकानदारांची झाडाझडती घेणे व नोटिसा देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ नुसार मराठी भाषेतून ठळक व मोठ्या अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. याबाबत पहिल्यांदा ३१ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र व्यापारी संघटनांच्या मागणीवरून तिसऱ्यांदा शेवटची मुदत ३० सप्टेंबरपर्यन्त देण्यात आली होती. मात्र ती मुदत संपल्यावर पालिकेने १० ऑक्टोबरपासून सदर ‘पाट्याटाकू’ दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here