@maharashtracity
मुंबई: जागतिक रेबीज दिन (World Rebies Day) दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी साजरा केला जात असून मुंबई महानगरपालिकेने (BMC) यावेळी २८ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ६ हजार कुत्र्यांना आणि मांजरींना रेबीज लसीकरण करण्याचे ठरवले आहे. तसेच रेबीज आजाराबद्दल तथ्ये आणि जागरूकता यांचा विचार करुन २०३० पर्यंत रेबीज शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठरवले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पालिकेच्या पशु आरोग्य विभागाने २८ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत रेबीज डे म्हणून सुमारे ६००० रस्त्यावरील कुत्रे आणि मांजरींचे रेबीज लसीकरण केले. महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंग चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा आणि उपायुक्त (विशेष) संजोग काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली रेबीज लसीकरण (vaccination) करणे सुरु आहे. तसेच मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध प्राणीप्रेमी संस्थांचे सहकार्य यासाठी घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाच्या महाव्यवस्थापक तथा पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या डॉ. कलिमपाशा पठाण यांनी दिली.
दिनांक २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिनानिमित्त अधिक माहिती देताना डॉ. पठाण म्हणाले की, रेबीज हा एक संसर्गजन्य रोग आहे जो कुत्रा, मांजर यांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या चावल्यानंतर किंवा ओरखड्यांनंतर होतो. जेव्हा संक्रमित प्राण्याची लाळ मानवाच्या त्वचेच्या किंवा जखमेच्या थेट संपर्कात येते तेव्हा रेबीजचा संसर्ग होऊ शकतो.
उपलब्ध आकडेवारीनुसार, आपल्या देशात दरवर्षी सुमारे १.५ कोटी (१५ दशलक्ष) लोकांना जनावरे चावतात. दरवर्षी या आजाराने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहे. ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये कुत्र्यांचा समावेश असून त्यातही बहुसंख्य भटके कुत्रे आहेत. या आजाराचे प्रमाण १.७ टक्के असल्याचा अंदाज आहे.
देशात दर ३० मिनिटांनी रेबीजमुळे मृत्यू झाल्याची बातमी येते. हे लक्षात घेऊन दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो आणि त्यानिमित्त विविध कार्यक्रम आणि मोहिमाही आयोजित केल्या जातात. लसीकरण मोहीम ९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत २० पशुवैद्यकही सहभागी होणार आहेत.