सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे पालिका प्रशासनाचे रहिवाशांना आवाहन

@maharashtracity

मुंबई: पूर्व उपनगरातील भांडुप, पवई, विक्रोळी परिसरातील डोंगराळ भागात, धोकादायक इमारती, घरांत राहणाऱ्या हजारो नागरिकांनी पावसाळ्यात दरड (landslide) कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन पाऊस सुरू होण्यापूर्वी पर्यायी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन “एस” वार्डाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी केले आहे.

पावसाळ्यात अतिवृष्टी (heavy rain) होऊन नैसर्गिक आपत्ती ओढवली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्यास मुंबई महापालिका (BMC) प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे सहाय्यक आयुक्त आंबी यांनी कळविले आहे.

पालिकेच्या “एस” विभागातील विक्रोळी (प.), सूर्यानगर, पवई येथील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभिम नगर, गौतमगर परिसर, भांडुप ( प.) येथील रमाबाई आंबेडकर नगर भाग १ व २, नरदास नगर, गांवदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, अशोक टेकडी, आंब्याची भरणी, डकलाईन रोड, नवजीवन सोसायटी, तानाजी वाडी, दर्गा रोड, खदान विश्वशांती सोसायटी या ठिकाणच्या टेकडी, डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास, डोंगरावरुन वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची व त्यामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असते.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन सदर धोकादायक परिस्थितीत राहणाऱ्या नागरिकांनी दुर्घटना घडून त्यात जीवित, वित्तीय हानी होण्यापूर्वीच खबरदारीची उपाययोजना म्हणून तात्काळ जागा खाली करून पर्यायी सुरक्षित जागेत स्थलांतरित व्हावे, असे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here