किमान-कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने घट
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबईत सोमवारी कुलाबा येथील किमान तापमान १८.८ तर सांताक्रुझ येथे १५.८ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान १४ ते १५ डिग्री तर कमाल तापमान हे २६ ते २९ डिग्रीच्या सरासरीत नोंद होत आहे.
किमान तसेच कमाल ही दोन्ही तापमाने सरासरीपेक्षा १ ते २ डिग्रीने घटल्याने नववर्षात थंडीची चाहूल लागत आहे. मात्र, मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक असून हा प्रभाव उत्तर भारतातील थंडी राजस्थान, गुजराथमार्गे कोकणात उतरत असल्याचे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. आगामी पाच दिवस थंडीचा हा प्रभाव कायम राहणार असल्याचा अंदाजही खुळे यांनी यावेळी वर्तवला.
दरम्यान, दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात ही थंडीचा प्रभाव काहीसा कमी असल्याचे सांगण्यात आले. कोकणासह राज्यातील संपूर्ण खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा घटले आहे.
उत्तरेतील पश्चिमी प्रभावामुळे थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक असुन अपेक्षित थंडी सध्या जाणवत नाही. तरीदेखील येत्या काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.