महानगरपालिकेच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकारी यांचे प्रसंगावधान

@maharashtra.city

मुंबई: जागतिक हृदय दिन दिनांक २९ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. यानिमित्त हृदय रोग होऊ नये किंवा हृदय विकाराचा झटका आल्यास सीपीआर कसा द्यावा याबाबत प्रशिक्षण दिले जाते. अशाच सीपीआरमुळे मेट्रो स्थानकात हृदय विकाराचा झटका आल्येल्या महिलेला कसे वाचविण्यात आले याबाबतचा किस्सा चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वी घाटकोपर मेट्रो स्टेशनवर (Ghatkopar Metro Railway station) एक २३ वर्षीय महिला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली. शेजारी उभ्या असणाऱ्या सह प्रवाशांनी त्या महिलेच्या तोंडावर पाणी मारुन व इतर उपाय करुन तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला कोणताही प्रतिसाद देत नव्हती. त्याचवेळी महानगरपालिकेच्या (BMC) सहार आरोग्य केंद्रातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी गायकवाड यांचे तेथील गर्दीकडे लक्ष गेले. त्यांनी जवळ येऊन बघितले असता, तिथे बेशुद्ध पडलेली महिला आणि तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत असलेले सह प्रवासी त्यांना दिसले. यानंतर डॉ. माधुरी व अन्य तीन डॉक्टरांनी या महिलेची प्राथमिक तपासणी करुन सीपीआर (CPR) दिल्याने प्राण वाचले.

दरम्यान, २९ सप्टेंबर आजच्या जागतिक हृदय दिनानिमित्त (World Heart Day) प्रत्येकजण हृदयाबद्दल आणि आरोग्याबद्दल सजग आणि जागृत असणे गरजेचे असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सुचित करण्यात आले आहे.

या महिलेची तपासणी करत असताना डॉ. माधुरी यांना नाडी लागत नसल्याचे त्यांना आढळून आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी त्या महिलेस तात्काळ सीपीआर देण्यास सुरुवात केली. सीपीआर अंतर्गत रुग्णाच्या छातीवर विशिष्ट पद्धतीने दाब देण्यासह तोंडावाटे रुग्णाच्या तोंडात अधिक दाबाने हवा फुंकली जाते. यानुसार दोनवेळा सीपीआर दिल्यानंतर रुग्ण महिला काही प्रमाणात शुद्धीवर आली.

याप्रसंगी त्या ठिकाणी असणाऱ्या डॉ. प्राही नायक आणि डॉ. चंद्रकांता यांनी देखील याकामी मोलाची मदत केली. तोवर सह प्रवाशांनी बोलविलेली रुग्णवाहिका आली होती. ज्यामधून त्या महिलेस तेथून जवळच राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले व पुढील वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले.

याबाबत बोलताना पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात नियमितपणे रक्तदाब तपासणी करणे, वैद्यकीय सल्ल्यानुसार वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करुन योग्य ते औषधोपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर दररोज किमान ३० मिनिटे चालणे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य तो व्यायाम करणे, या बाबीदेखील आवश्यक आहेत. चांगल्या सवयी केवळ आपल्यापुरता मर्यादित न ठेवता, त्या अंगिकारण्यासाठी कुटुंबियांना, मित्रांना देखील प्रेरित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here