By Sadanand Khopkar
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नयेत यासाठी लवकरच वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (Traffic Management System) लावण्यात येईल, तसेच महामार्गावर जिथे प्रवेश होतो, तेथेच वाहनातील प्रवाशांची पडताळणी केली जाईल. वाहनात अधिक प्रवासी असतील, तर अशी वाहने आहे तिथेच अडविण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत जाहीर केले.
समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) झालेल्या कार अपघातात छत्रपती संभाजीनगर येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. संजय रायमुलकर आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (LoP Ajit Pawar) यांनी याविषयी प्रश्न विचारत अपघातप्रवण स्थळांवर काय उपायोजना करणार असा प्रश्न विचारला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देताना म्हणाले, समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम लावण्यात येणार आहे. तसेच महामार्गावर जिथे प्रवेश होतो, तेथेच वाहनातील प्रवाशांची पडताळणी केली जाईल. वाहनात अधिक प्रवासी असतील, तर अशा वाहनांना अडवले जाईल.
मंत्री शंभुराजे देसाई यांनी अपघाताबाबत निवेदन केले. अपघात सकाळी ८ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास झाला. वाहनात जवळपास १३ व्यक्ती प्रवास करत होत्या. वाहनाची क्षमता ७ व्यक्तींची होती. ओव्हरस्पीड आणि चालकाचे नियंत्रण सुटणे ही अपघाताची सकृतदर्शनी कारणे दिसत आहेत. तरीही मृतांच्या नातेवाइकांना साहाय्य देण्याच्या अनुषंगाने सर्व गोष्टी पडताळून उचित कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले.