@maharashtracity
मुंबई
पालिकेच्या फक्त केईएम रुग्णालयातच पॅरेलेसीस लकवा आजारावर मॅजिक मशीनने उपचार केले जातात अशा सोशल मिडियावर फिरत असलेला मेसेजमुळे केईएम रुग्णालयाच्या न्यूरो सर्जरी विभागात गर्दी वाढत आहेत. मात्र यामुळे केईएम रुग्णालयातील न्यूरो सर्जरी विभागाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे न्यूरो विभाग प्रमुख डॉ. अदिल छागला यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे तक्रार केली आहे.
शिवाय केईएम व्यतिरिक्त पालिकेच्या सायन आणि नायर रुग्णालयातही हे उपचार करणारी मशीन असल्याचे डॉ छागला म्हणाले. तसेच मेंदूला होणारे स्ट्रोक अनेक प्रकारचे असून प्रत्येक स्ट्रोकनुसार उपचार केले जात असल्याचे ही डॉ. छागला म्हणाले.
गेल्या तीन वर्षांपासून सोशल मिडियावरुन केईएम रुग्णालयाच्या न्यूरो विभागाचा पक्षघात रुग्णांसाठीचा मेसेज वायरल होत आहे. यात के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये पक्षघात (पॅरेलेसीस /लकवा ) या आजारावर ऍटोमॅटिक मशीनने काही तासातच रुग्ण पूर्ववत बरा होतो, मेंदूच्या गाठी या मशीनच्या सहाय्याने एन्जोप्लास्टीप्रमाणे काढुन टाकल्या जातात, तसेच भारतात प्रथम केईएम हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली असल्याचे हा मेसेज सांगतो.
मात्र या मेसेजचा त्रास केईएम रुग्णालयातील न्यूरो सर्जरी विभागप्रमुख न्यूरो सर्जन डॉ. अदिल छागला याना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांनी या मेसेजची तक्रार केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगिता रावत यांच्याकडे केली असल्याचे सांगितले. तसेच ते सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.
या मेसेजमध्ये ज्या ऍटोमॅटिक मशीनचा उल्लेख करण्यात आला आहे त्याचे नाव बाय प्लेन डीजीटल सबस्ट्रॅक्शन एन्जोग्राफी असे असून काही लोक या मशीनला मॅजिक मशीन म्हणतात. ही मशीन केइएम रुग्णालयासह पालिकेच्या सायन आणि नायरमध्ये सुद्ध उपलब्ध आहे. या ठिकाणी देखील चांगले उपचार होत असल्याचे डॉ. छागला यांनी स्पष्ट केले. शिवाय मेंदूला येणारे स्ट्रोक एकाहून अधिक प्रकारचे असून त्या स्ट्रोकप्रमाणे उपचार करण्यात येतात.
संबंधित मेसेज वाचून एखाद्या रुग्णाचा नातेवाईक थेट केईएममध्ये आल्यास तो रुग्ण योग्य उपचारापासून वंचितही राहू शकतो, अशी शक्यता देखील डॉ. छागला यांनी स्पष्ट केली. केईएम रुग्णालयाच्या नावाने मेसेज व्हायरल केल्यामुळे रुग्णाचा केईएम रुग्णालयावरील विश्वासाला तडा बसू शकतो. म्हणून तक्रार केल्याचे ते म्हणाले. शिवाय नागरिकांनी अशा खोट्या मेसेजवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. आदिल छागला यांनी केले आहे.