@maharashtra.city
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना, नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना लागले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC polls) येत्या डिसेंबर महिन्यात अथवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेत न भूतो न भविष्यती अशी बंडखोरी करून आणि राजकीय सूत्रे जुळवीत राज्याचे मुख्यमंत्री पद मिळविणारे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटासोबत पुन्हा एकदा सत्ता मिळविणाऱ्या भाजपच्या राज्यस्तरीय बड्या नेत्यांबरोबर उठबस असलेल्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.
मुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, हे सर्वज्ञात आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेची (Shiv Sena) गेल्या २५ वर्षांपेक्षाही जास्त काळ सत्ता हाती राहिली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून भाजपशी (BJP) काडीमोड घेऊन दोन्ही काँग्रेसच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi government) स्थापन करून अडीच वर्षे शिवसेनेने सत्ता उपभोगली. उद्धव ठाकरे यांनी कोणताही अनुभव पाठीशी नसताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या ‘पॉवर’ च्या आधारे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार चालविला. मात्र दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करून ४९ आमदारांचा गट स्थापन करून भाजपशी संधान बांधून राज्यात सत्ता मिळवली आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर शिंदे सरकार विराजमान झाले.
एवढी दयनीय व बिकट अवस्था झाल्यानंतरही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, हार न मानता पुन्हा एकदा मुंबई महापालिका म्हणजे ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी’ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी जोरदार हालचाली चालविल्या आहेत. त्याचप्रमाणे भाजप व शिंदे गटही ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपल्या खुराड्यात आणून तिला आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे सर्वाना वेध लागले आहेत. राज्यात राजकीय भूकंप झाल्याने व शिंदे यांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लोकांकडून भावनिक सहानुभूती लाभत आहे. एका निवडणूक सर्वेक्षणानुसार उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने हवा आहे.
वास्तविक, मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपण्यापूर्वीच निवडणूक होऊन नवीन महापालिका गठीत व्हायला पाहिजे होती. मात्र ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) मुद्दा व इतर कारणांस्तव मुंबई महापालिकेची निवडणूक अगोदरच पुढे ढकलली जाऊन रखडली आहे.
आता राज्यात सत्तांतर झाले आहे. मात्र या परिस्थितीत निवडणूक घेतल्यास भाजप व एकनाथ शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने कदाचित याच कारणास्तव मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असावी. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मतदारांची सहानुभुती मिळू नये यासाठी राज्य सरकार वेळकाढूपणा करीत असावी.
मात्र, भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांसोबत उठबस असलेल्या एका भाजप नेत्याकडे, पालिका निवडणुकीबाबत विचारणा केली असता त्यांनी, हिवाळी अधिवेशन पाहता येत्या डिसेंबर महिन्यात अथवा जानेवारी महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हा नेता राज्यस्तरीय नेत्यांसोबत उठबस करीत असल्याने त्यांच्या बोलण्यात दम असल्याचे बोलले जाते.
… तर फेब्रुवारीत निवडणूक
सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भावनिक सहानुभूती लाभल्याचे बोलले जात असल्याने कदाचित वेळकाढूपणा करण्यासाठी व सहानुभूतीची तीव्रता कमी करण्यासाठी फार फार तर ही निवडणूक फेब्रुवारी महिन्यात घेतली जाईल, अशी शक्यताही राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे.