@maharashtracity
मुंबई: जगात रशिया व युक्रेन यांच्यातील भीषण युद्ध (Russia – Ukraine war) सुरू असताना आणि मुंबईला दहशतवाद्यांचा धोका असताना शांत असलेल्या मुंबई शहरात गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी शुक्रवारी दुपारी ‘बॉम्ब स्फोट’ झाला आणि त्यात अनेकजण जखमी झाल्याचा कॉल आल्याने मुंबई महापालिका आपत्कालीन विभाग (disaster management) हादरला.
सुदैवाने घटनास्थळी अग्निशमन दल (Fire brigade) तात्काळ मदतीला पोहोचले. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब डिटेक्शन स्कॉड (Bomb detection squad) आदी यंत्रणा तात्काळ दाखल झाल्या व त्यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य करून जखमींना रुग्णालयात नेले.
ही सर्व घटना जवळून पाहणाऱ्या तेथील नागरिकांना नंतर या घटनेचा उलगडा झाला की, हे तर पालिकेचे ‘आपत्कालीन मॉकड्रिल’ (mock drill) होते. हुश्श आणि घटनेपूर्वी टेन्शनमध्ये असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वास्तविक, मुंबईत यापूर्वी १९९२ मध्ये बॉम्बस्फोटाच्या (Mumbai bomb blast) घटना घडल्या असून त्यात अनेकजण जखमी व अनेकांचा मृत्यूही झाला. त्यानंतर पुन्हा पाकिस्तानी अजमल कसाब (Ajmal Kasab of Pakistan) व त्याच्या साथीदारांनी २००८ मध्ये सीएसएमटी रेल्वे स्थानक व गेट वे ऑफ इंडिया समोरील हॉटेल ताजवर दहशतवादी हल्ला चढवला होता. आता पुन्हा एकदा मुंबई शहर हे दहशतवादी संघटनांच्या रडारवर आहे.
अशा दहशतवादी संघटनांकडून अचानक बॉम्ब हल्ला, गोळीबार झाल्यास नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, अशा घटनांचा मुकाबला कसा काय करावा, जखमींना कशी काय मदत करावी, याबाबत नागरिकांना माहिती व्हावी व त्यांच्यात जागृती यावी, या उद्देशाने शुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पालिका आपत्कालीन विभाग, अग्निशमन दल, पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्या संयुक्त विद्यमाने गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी एक आपत्कालीन मॉकड्रिल घेण्यात आले.
बॉम्बस्फोट झाल्याची कृत्रिम घटना घडवून आणून त्यावेळी जखमींना कशी मदत करावी याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी, मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यास व बॉम्ब स्फोटसारखी घटना घडल्यास नागरिकांनी अलर्ट राहून व घाबरून न जाता जखमींना मदत करावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले.
याप्रसंगी पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व पालिका अधिकारी उपस्थित होते.