गच्चीवर रहिवासी सुखरूप

@maharashtracity

मुंबई: विलेपार्ले येथे एलआयसी ऑफिसला (LIC office) व त्यानंतर रविवारी धारावी (Dharavi) येथे झोपडीस आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच लागोपाठ तिसऱ्या दिवशी वांद्रे येथील सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्या वांद्रे (Bandra) येथील ‘मन्नत’ (Mannat) या बंगल्यानजीकच्या एका बहुमजली इमारतीत सोमवारी रात्रीच्या भीषण आग लागली. या इमारतीच्या टेरेसवर अडकून पडलेल्या रहिवाशांना आग विझविल्यानंतर इमारतीबाहेर काढण्यात येणार आहे.

या आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या (Fire brigade) जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. आगीच्या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मुंबई अग्निशमन दलाकडून प्राप्त माहितीनुसार, वांद्रे (पश्चिम), बँडस्टॅण्ड रोड, ‘मन्नत’ बंगल्यानजीक असलेल्या तळमजला अधिक २१ मजली ‘जिवेश’ या टॉवरमधील १४ व्या मजल्यावर सोमवारी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास आग (Fire) लागली. काही भयभीत रहिवाशांनी इमारतीबाहेर धाव घेतली. तर काही रहिवाशी जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेले. तेथे ते सुखरूप आहेत. मात्र आग विझविल्यानंतर त्या सर्व रहिवाशांना गच्चीवरून खाली आणण्यात येणार असल्याचे समजते.

स्थनिक पोलीस, पालिका वार्ड कार्यालय अधिकारी, अग्निशमन दल यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. मात्र, अवघ्या अर्ध्या तासात आग भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने रात्री ८.०५ वाजेच्या सुमारास आग स्तर -२ ची असल्याचे जाहीर केले. अग्निशमन दलाने ८ फायर इंजिन व ७ जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला.

रात्री उशिरापर्यन्त आग विझविण्याचे काम सुरू होते. या आगीत कोणीही जखमी झालेले नसल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here