@maharashtracity

मुंबई: मुंबईत साथीचे आजार, कोविड इतर विविध आजारांना तोंड देण्यासाठी व त्वरित रोग निदान आणि उपचार साहाय्य देण्यासाठी नागरिकांच्या घराजवळ २०० हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

या ठिकाणी डॉक्टर, औषधालय, परिचारिका कक्ष व रुग्ण तपासणी कक्ष यांचा समावेश असणार आहे. तसेच, या केंद्रात १३९ विविध प्रकारच्या चाचण्या, क्ष- किरण चाचणी, सीटी स्कॅन, मॅमोग्राफी इत्यादी चिकित्सा नाममात्र शुल्कात खासगी सहभागातून उपलब्ध करण्यात येणार आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली. तसेच, या केंद्रांवर टेलिमेडिसिन मार्फत केईएम, सायन, नायर, कूपर रुग्णालय येथील विषेश व अतिविशेष डॉक्टरांचे सल्ले, मार्गदर्शन घेऊन मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, ह्रदयरोग आदी आजारांची तपासणी व त्यांवर उपचार करण्यात येणार आहेत. त्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

शिव योगा केंद्र

आजारांवर उपचार, उपाययोजना करण्यापेक्षा ते आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यासाठी पालिका २०० ठिकाणी शिव योगा केंद्र सुरू करणार असून त्यासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली.

ही योग केंद्रे सार्वजनिक सभागृहे, पालिका अथवा खासगी शाळा सभागृह, मंगल कार्यालये इत्यादी ठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, तज्ज्ञांच्या मार्फत २०० योगा केंद्रांच्यामार्फत ऑनलाईन योग प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुंबईचा विकास

मुंबई महापालिकेच्या २०२२ – २३ च्या अर्थसंकल्पात ५१ टक्के महसुली तर ४९ टक्के भांडवली खर्च होणार आहे. २२२६४ कोटी रुपये भांडवली मूल्यामधील ५० टक्के रक्कम विकासकामांवर खर्च होणार आहे. त्यामुळे मुंबईचा चांगल्या प्रकारे विकास होईल, असा दावा पालिका आयुक्तांनी केला आहे.

पालिकेला विकास नियोजन विभागातून मोठा फायदा झाला आहे. प्रीमियममधून २ हजार कोटी मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र जानेवारीपर्यंत १३,५४३ कोटी आले आहेत. मार्च पर्यंत १४,७५० कोटी रुपये मिळतील, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.

पालिकेने नेहमीच क्लायमेंट चेंजवर लक्ष दिले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने प्लॅन तयार केला असून तो कागदावरच राहू नये म्हणून २२ जानेवारीला १०० मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी करार करण्यात आला आहे.

बेस्टमध्ये १९०० इलेक्ट्रिक बसेस आणल्या जाणार आहेत. २०२५ पर्यंत ३५०० बसचा ताफा ४ हजार केला जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. इलेक्ट्रिक वाहने चार्जिंगसाठी पॉईंट बनवले जाणार आहेत. पालिकेच्या ३० पार्किंगपैकी १२ मध्ये टाटा व इतर कंपन्यांच्या माध्यमातून चार्जिंग पॉईंट बनवले जातील. इतर १८ मध्ये लवकर चार्जिंग पॉईंट बनवले जातील. पालिका कचरा गोळा करणाऱ्या गाड्या इलेक्ट्रिक असतील. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.

समुद्राचे पाणी गोड करणार

पाणी ही मूलभूत गरज आहे. २०२२-२३ मध्ये पिण्याच्या पाण्याची जास्त गरज भासणार आहे. ४ ते ५ हजार झाडे तोडून गारगाई आणि पिंजाळ प्रकल्प उभारला जाणार होता. या झाडांची कत्तल होऊ नये म्हणून गारगाई पिंजाळ प्रकल्प न करता २ हजार एमएलडी पाणी निक्षारीकरण प्रकल्पातून समुद्राचे पाणी गोडे केले जाणार आहे. हा प्रकल्प येत्या ३ वर्षात पूर्ण होईल, असे आयुक्त यांनी सांगितले.

मुंबईत कोविडने आपला मुक्काम वाढवला आहे. त्यामुळे पालिकेने एकूण बजेटपैकी १५ टक्के रक्कम म्हणजे ७ हजार कोटी रुपये आरोग्यासाठी तरतूद केली आहे. आरोग्याच्या तरतुदीमध्ये मागील वर्षापेक्षा १५० टक्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here