@maharashtracity
मुंबई: गेले दोन दिवस मुंबईत पावसाची सकाळपुरती रिपरिप सुरु होती. शुक्रवारी मात्र सकाळपासून मुसळधार पावसाने सुरुवात केली. यात मुंबई महानगर प्रदेश परिसरात जोरदार सरी (heavy rain) झाल्या. कालच्या पावसामुळे मुंबई लोकल २० ते २५ मिनिटांनी उशिरा धावत होत्या. तर रस्त्यावर पाणी साचल्याने (waterlogging) वाहतूक खोळंबल्याचे चित्र होते. दुपारनंतर पावसाचा वेग कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. शुक्रवारच्या मुसळधार पावसाचा इशारा मुंबई वेधशाळेकडून देण्यात आला होता. यात पहाटे २.३० वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सदृश्य स्थिती होणार असल्याचा अंदाज होता. मात्र ही वेळ टळून पहाटे ६ वाजल्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केली. त्यातून खोळंबा सुरु झाला.
सकाळच्या सत्रात पाऊस झाल्याने कामावर जाणार चाकरमान्यांची त्रेधा उडाली. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुलाबा येथे ३१.४ तर सांताकुंझ येथे ३९.५ मिमी पावसाची नोंद झाल्याचे मुंबई वेधशाळेकडून सांगण्यात आले. उत्तर भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गुजरात ते गोवा तसेच मध्य महाराष्ट्रावर पावसाचे ढग पसरल्याचे या मागील कारण सांगण्यात आले. शनिवारनंतर पावसाची तीव्रता कमी होणार असल्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, मनपाच्या (BMC) स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवरील नोंदीप्रमाणे शहरात २९.८८, पूर्व उपनगरात ४४.४९ तर पश्चिम उपनगरात ४५.११ मिमी एवढी सांगण्यात आली. सकाळपासूनच पूर्व तसेच पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम होता असल्याची नोंद आहे. तुलनेने पश्चिम उपनगरांना अधिक झोडपून काढले.
मुसळधार सरींनी रस्ते जलमय केली. बोरिवली, कांदिवली, गोरेगाव हा पश्चिमेकडील भाग तर पवई, भांडूप, मुलुंड घाटकोपर या भागात सर्वाधिक पाऊस झाल्याचे नोंदी सांगत आहे. कुलाबा वेधशाळेने आगामी २४ तासांत आकाश साधरणतः ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचे सांगितले. मात्र, उपनगरात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
शुक्रवारी दिवसभरात शहरात २, पूर्व उपनगरात १ तर पश्चिम उपनगरात ८ अशा ११ ठिकाणी झाडे पडण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात १ अशा दोन ठिकाणी घर तसेच घराच्या भिंती पडल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर शहरात १, पूर्व उपनगरात २, आणि पश्चिम उपनगरात १ अशा चार ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तक्रारी मुंबई महानगरपालिकेकडे करण्यात आल्या.
“कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर प्रदेशाच्या मध्यभागावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अरबी समुद्रात उत्तर प्रदेशापर्यंत ट्रफ रेषा निर्माण झाली आहे. तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढला आहे. म्हणून कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारी देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.”
- सुषमा नायर, वैज्ञानिक, भारतीय हवामान शास्त्र विभाग, मुंबई