कोरोना आढावा बैठकीत पालिका आयुक्तांचे आदेश

कोरोनाच्या चौथ्या लाटेची पालिकेला धास्ती

कोरोनाबाधित जास्त प्रमाणात आढळणाऱ्या विभागात होणार सामूहिक चाचण्या

जम्बो कोविड सेंटर, खासगी रुग्णालये व सर्व वॉर्ड वॉर रुम सुसज्ज करण्याचे आदेश

‘घर घर दस्तक’ अभियानातून सर्वांचे करणार लसीकरण

@maharashtracity

मुंबई: मुंबईत पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाच्या चौथ्या (fourth wave of Corona) लाटेबाबत दिलेला इशारा पाहता पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, कोरोना बाधितांचा कसून शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी. तसेच, ज्या विभागात कोरोनाबाधित जास्त प्रमाणात आढळतील त्या विभागात सामूहिक चाचण्या करण्यात याव्यात, असे आदेश पालिका आरोग्य यंत्रणेला दिले आहेत.

त्याचप्रमाणे, पावसाळा सुरू होणार असल्याने जलजन्य आजारांची शक्यता पाहता आरोग्य यंत्रणेसह विभाग कार्यालये व सर्व संबंधित खात्यांनी सुसज्ज राहण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईत आयपीएल क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. त्यावेळी स्टेडियममध्ये हजारोंच्या संख्येने क्रिकेट प्रेमींनी गर्दी केली होती. त्यानंतर आता लगेचच पावसाळा सुरू होणार आहे. असे असताना मुंबईत गेल्या काही दिवसांत अचानकपणे कोरोना रुग्णांच्या (corona patients) संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकार व पालिका आरोग्य यंत्रणा काहीशी हादरली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उप मुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत सतर्क राहण्याचे आदेश पालिका आरोग्य यंत्रणेला व जनतेला दिले आहेत.

याच अनुषंगाने पालिका आयुक्त इकबाल चहल (I S Chahal) यांनी, शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक घेतली. याप्रसंगी महाराष्ट्र कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांच्यासह महापालिकेचे सर्व अतिरिक्त आयुक्त, सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इतर सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या चौथ्या लाटेची पालिकेला धास्ती

कानपूर आय. आय. टी. तज्ज्ञांनी जुलै २०२२ मध्ये कोविडची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली असून त्यांचा इशारा गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. कारण याआधीच्या कोविड लाटांबाबत त्यांनी वर्तवलेले अंदाज देखील खरे ठरले होते. कोविड विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या अलीकडे वाढली आहे. हे लक्षात घेतले तर चौथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक बाबींवर पुन्हा एकदा विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यातच पावसाळा तोंडावर आलेला असल्याने कोरोना व पावसाळा आणि साथीचे आजार या बाबींना समर्थपणे तोंड देण्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश आयुक्त चहल यांनी दिले आहेत.

पालिका आयुक्त यांचे आदेश

१) मुंबईत कोरोना चाचण्यांची प्रतिदिन संख्या ८ हजारावरून ३० ते ४० हजार पर्यंत वाढविण्यात यावी. कारण सध्या बाधित रुग्णांचे प्रमाण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून हा दर सावधानतेचा इशारा देणारा आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांची संख्या वाढली तर त्यामुळे जास्तीत-जास्त बाधितांचा शोध घेणे सोपे होईल व कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करता येईल.

२) सर्व परिमंडळांचे सह आयुक्त / उप आयुक्त, सहायक आयुक्त तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी कोरोनाबाधित रुग्णांचा संपर्कातील सर्व नागरिकांचा शोध घेऊन त्यांची कोविड चाचणी करावी.

३) ज्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये बाधित आढळतील, त्या इमारती / गृहनिर्माण संस्थांमध्ये सर्व रहिवाशांची सामूहिक कोविड चाचणी करावी. तसेच त्या इमारती / गृहनिर्माण संस्था लवकरात लवकर संसर्गमुक्त होतील, यावर लक्ष केंद्रीत करावे.

४) सर्व वैद्यकीय प्रयोगशाळांना सुसज्ज ठेवणे. तसेच, वाढीव संख्येने चाचण्या करण्याची क्षमता आणखीन वाढवावी.

५) वैद्यकीय प्रयोगशाळांनी कोणत्याही रुग्णाला कोविड बाधित असल्याचा अहवाल परस्पर न देता पालिकेकडे पाठवावेत. या बाबीचे उल्‍लंघन केल्यास संबंधित वैद्यकीय प्रयोगशाळेवर सक्त कारवाई केली जाईल.

६) महापालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षात पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध राहील, असे नियोजन करावे. सर्वत्र मनुष्यबळ व रुग्णवाहिका सुसज्ज ठेवणे.

७) सर्व कोरोना जम्बो सेंटर येथील व्यवस्थान यांनी सतर्क राहून कोरोना रुग्ण दाखल करुन घेण्यासाठी सुसज्ज यंत्रणा, वैद्यकीय मनुष्यबळ व इतर कर्मचारी नेमणे.

८ ) कोरोनाबाधित व साथीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांची काळजी घेण्यात यावी.

९) सर्व खासगी रुग्णालयांनी आपली आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी.

१०) सर्व रुग्णालयांनी गरजेइतका औषधसाठा खरेदी करुन उपलब्ध करुन घ्यावा.

११) कोरोना विषाणूचे जनुकीय सूत्र निर्धारण अर्थात जिनोम सिक्वेसिंग करण्याची कार्यवाही नियमितपणे सुरु ठेवावी. जेणेकरुन विषाणूचा कोणताही नवीन उपप्रकार वेळीच निदर्शनास येईल.

१२) सर्व झोपडपट्टी परिसरांमध्ये नियमितपणे संसर्ग प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात यावी. विशेषतः झोपडपट्टयांमधील सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये / शौचालयांमध्ये दिवसातून किमान ५ वेळा जंतुनाशक औषध फवारणी करणे.

१३) १२ ते १५ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण जास्तीत-जास्त संख्येने करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. तसेच १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुला – मुलींचे देखील जलदगतीने लसीकरण करावे.

१४) वैद्यकीय औषधी दुकानांमधून विकले जाणाऱया सेल्फ टेस्टिंग कोरोना कीटची आकडेवारी पालिका प्रशासनाला पाठविणे.

‘घर घर दस्तक’ अभियानाद्वारे लसीकरण -: डॉ. ओक

या बैठकीत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र कोरोना टास्क फोर्स प्रमुख डॉ. संजय ओक यांनी, पुढील एक दोन आठवडे कोविड परिस्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच, कोरोना बाधित रुग्ण शोधून काढणे हे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे. कोविड विषाणूचे नवीन उप प्रकार आढळले असले तरी त्यांच्या तीव्रतेबद्दल अद्याप भाष्य करता येणार नाही. मात्र सर्वांनी नियमितपणे मास्कचा उपयोग करणे. ‘घर घर दस्तक’ सारख्या अभियानातून सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतात, अशी सूचना डॉ. ओक यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here