महा कॅटनाचे अध्यक्ष सुरेंद्र जगताप यांची मागणी

By Sachin Unhalekar

Twitter: @Rav2Sachin

मुंबई : राज्यातील सर्व कला महाविद्यालयांचे एक स्वतंत्र कला विद्यापीठ असावे आणि हे विद्यापीठ जेजे अंतर्गत असावे, अशी आमची मागणी आहे. जेजे आमची आई असून डी – नोव्हा विद्यापीठ (D-Nova University) द्वारे आमच्या आईला सर्व कला महाविद्यालयापासून दूर करण्याचा घाट घातला जात आहे. डी – नोव्हा विद्यापीठद्वारे जेजे सक्षम करण्याचा उदोउदो केला जात असेल तर केवळ जेजेलाच कशाला, सर्वच कला महाविद्यालयांना डी – नोव्हा विद्यापीठ करण्यासाठी मान्यता देऊन त्यांनाही सक्षम करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य चित्रकला महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर संघ (महा. कॅटना) चे अध्यक्ष सुरेंद्र जगताप यांनी केली.

डी – नोव्हा विद्यापीठ हे सर्व कला महाविद्यालयांना निर्माण करण्यासाठी शासनाने अधिकृत मान्यता द्यावी, यासंदर्भातील महाराष्ट्र कॅटना संघटनातर्फे शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी Maharashtra.city शी बोलताना सांगितले.

सध्या महाराष्ट्र राज्यात ४ शासकीय, ३१ अनुदानित आणि १२५ विनाअनुदानित कला महाविद्यालय आहेत. जे जे कला महाविद्यालयाचे स्वायत्तता विद्यापीठ म्हणजेच डिनोव्हा विद्यापीठ जर झाले तर जेजेचे भवितव्य उज्वल होईल, असा डी – नोव्हा विद्यापीठ समर्थकांचा दावा आहे.

जेजे हे स्वायत्तता विद्यापीठ झाल्यास येथील शैक्षणिक स्तर उंचविण्यासोबत आर्थिक बाजूसाठी शासनावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. जेजेचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम असेल. अशा पद्धतीने जेजे डी – नोव्हा विद्यापीठ झाल्यावर खऱ्या अर्थाने सक्षम होण्यास मदत होणार आहे. शैक्षणिक फी किती असावी, याचा निर्णयही स्वयंपणे जेजे घेऊ शकते. यातून जेजे स्वतः ची आर्थिक बाजू भक्कम होईल. तसेच दानशूर व्यक्ती आणि बड्या बड्या कंपन्याकडून देणग्या घेण्याचा अधिकार प्राप्त झाल्याने जेजे स्वतः सक्षम होऊ शकते, असे डिनोव्हा विद्यापीठ समर्थकांचा दावा असल्याचे जगताप यांनी सांगितले.

त्यामुळे शासनाने जेजे कला महाविद्यालयासोबत राज्यातील सर्व कला महाविद्यालयांना स्वायत्त विद्यापीठ म्हणजे डी – नोव्हा विद्यापीठ करण्यासाठी मान्यता द्यावी. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित कला महाविद्यालयांना शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागणार नाही, तर ते स्वतः च्या पायावर उभे राहतील, अशी उपरोधक प्रतिक्रिया जगताप यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, जेजे ही राज्यातील सर्व कला महाविद्यालयांची आई आहे. आई ज्या वाटेवर चालणार त्या वाटेवर सर्व कला महाविद्यालय चालणार. आईला एकटे सोडून कोणी जात नाही. त्यामुळे जेजे प्रमाणे सर्व कला महाविद्यालयांना डी – नोव्हा विद्यापीठ करण्यासाठी शासनाने मान्यता द्यावी.

डी – नोव्हा विद्यापीठाला कला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन किती असावे हे ठरवण्याचा अधिकार प्राप्त होईल. यासह त्यांना कायमस्वरूपी न ठेवण्याचा अधिकारही वापरता येईल. भरमसाठ फी वाढ करण्याचे निर्णयही घेता येईल. डी – नोव्हा विद्यापीठ अंतर्गत सर्व कला महाविद्यालय स्वतः चा वेगवेगळ्या पद्धतीने कला अभ्यासक्रम तयार करु शकतील. प्रत्येक महाविद्यालयाचा अभ्यासक्रम वेगळा, हा चमत्कार केवळ डी – नोव्हा विद्यापीठाने साध्य होणार आहे, अशी खोचक टीका जगताप यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here