बृन्हमुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेचा आंदोलनाचा इशारा

Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील संचालक, अधिष्ठाता आणि अध्यापक यांचे वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने जाहिर केल्याने वैद्यकीय शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. या निर्णयामुळे हजारहून अधिक शिक्षकांनी पदोन्नतीचे पात्रता निकष पूर्ण केले असून देखील त्यांना पदोन्नती मिळणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या निर्णय परिपत्रकाचा फेरविचार करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा बृहन्मुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या पाच प्रमुख रुग्णालये केईएम, नायर, शीव, कूपर आणि नायर दंत महाविद्यालयातील संचालक, अधिष्ठाता आणि अध्यापक याचे सेवानिवृत्ती वय ६२ वरून ६४ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच परिपत्रक जारी करण्यात आले. मात्र यातून शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.

यावर पालिका आयुक्तांची भेट घेत निर्णय मागे घेण्याबाबत सांगण्यात आले. तसेच बृन्हमुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महानगर पालिका आयुक्त यांना देखील निवेदन देत प्राध्यापकांचे वय वाढविण्यात येऊ नये अशी विनंती केली होती. आता महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन त्यांना हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात विनंती करण्यात येणार आहे. त्यानंतरही निर्णय कायम ठेवल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय बृन्हमुंबई महानगरपालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे सचिव डॉ. रवींद्र देवकर यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या पाच प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केईएम रुग्णालय संलग्न सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय, नायर रुग्णालय संलग्न टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, शीव रुग्णालय संलग्न लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय, कूपर रुग्णालय संलग्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय तसेच नायर दंत महाविद्यालय ही पाच महाविद्यालये आहेत. यातील शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यामुळे निवृत्ती वयोमर्यादा नव्या निकषाला विरोध केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here