@maharashtracity
मुंबई: यंदाच्या पावसाळ्यात साठवण जलाशयामुळे हिंदमाता परिसर ज्याप्रमाणे पुरमुक्त होणार आहे, त्याचप्रमाणे अंधेरी परिसरातील “मिलन सब वे” (Flood free Milan subway) परिसरसुद्धा २ कोटी पाणी साठवण क्षमता असलेल्या जलाशयाच्या उभारणीमुळे पुरमुक्त होणार आहे.
पालिका अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू यांनी, मंगळवारी पश्चिम उपनगरातील मिलन सब वे, पोयसर नदी विकास प्रकल्प, रस्ते, पूल बांधकामे आदींची पाहणी केली. तसेच, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, रस्ते, पूल दुरुस्ती आदी कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.
साठवण जलाशयामुळे यंदा दिलासा
पावसाळ्यादरम्यान अतिवृष्टीच्या (heavy rain) काळात अंधेरी परिसरातील ‘मिलन सबवे’ लगतच्या परिसरात पाण्याचा निचरा अत्यंत संथ गतीने होतो. यावर पर्यायी उपाययोजना म्हणून मिलन सबवे लगत असणाऱ्या महापालिकेच्या एका भूखंडावर तब्बल दोन कोटी लिटर क्षमतेचे ‘साठवण जलाशय’ (storage tank) उभारण्यात येत आहे. या साठवण जलाशयाचे काम प्रगतीपथावर असून येत्या पावसाळ्यात याचा उपयोग होण्यास सुरुवात होणार आहे, असे पालिकेने म्हटले आहे.
अंधेरी (पूर्व ) परिसरात असणाऱ्या तेली गल्ली पासून ते गोखले उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्यावरून नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हा पूल ५७० मीटर लांब व १७ मीटर रुंदीचा असणार आहे.
पर्यावरणपूरक विकासाचे उत्तम उदाहरण ठरणाऱ्या गोरेगावातील दिनकरराव देसाई मार्गासह (आरे कॉलनी मार्ग) परिसरातील विविध रस्त्यांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. विशेष म्हणजे या परिसरात असणाऱ्या वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडणे सुलभ व्हावे, यासाठी वनखात्याच्या सल्ल्यानुसार रस्त्याच्या खालून वन्य प्राण्यांसाठी स्वतंत्र मार्गिकांची (underpass for wild animals) व्यवस्था देखील या प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे.
एकही झाड न कापता करण्यात येत असलेल्या या प्रकल्प कामांची अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी आज पाहणी केली.
‘आर दक्षिण’ विभागांतर्गत पोईसर नदीवर डहाणूकर वाडी ते ‘लिंकिंग रोड’ दरम्यान नवीन पुलाची उभारणी प्रगतिपथावर आहे. ८० मीटर लांब व १७ मीटर रुंद असणाऱ्या या पुलामुळे परिसरातील नागरिकांना आणखी एक नवा पोहोच रस्ता उपलब्ध होणार आहे.
‘आर (मध्य)’ विभागाअंतर्गत बोरिवली पश्चिमेला ‘कल्पना चावला चौक’ ते ‘स्वामी विवेकानंद मार्ग’ यादरम्यान ‘आर. एम. भट्टड’ मार्गावरून जाणाऱ्या उड्डाण पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
तब्बल ९३७ मीटर लांब आणि १५.३ मीटर रुंद असणाऱ्या या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या पुलामुळे आर. एम. भट्टड मार्गावरील व परिसरातील वाहतुकीवरचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.