सध्या होणारा पाऊस पूर्व मान्सून आणि चक्रीवादळाचा मिश्र परिणाम

Twitter : @maharashtracity

मुंबई: नैऋत्य मान्सूनच्या मार्गक्रमणासाठी वातावरण अनुकूल असले तरी पुढे मार्गस्थ होण्यासाठी त्याचा कमकुवतपणा झाकून राहिलेला नाही. कारण महाराष्ट्राच्या प्रवेशद्वारावर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरच गेल्या ४ दिवसापासून घुटमळत असून त्यात प्रगती नाही. सध्या आहे त्याच ठिकाणी तो खिळलेला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. मुंबईत मान्सून (Monsoon) दाखल होण्यासाठी रविवार उजाडेल असे भाकितही करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या अधून मधून सरी होत आहेत. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसून पूर्व मान्सून आणि चक्रीवादळाचा मिश्र परिणाम असल्याचे हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. दरम्यान, बिपोरजॉय चक्रीवादळाच्या (Biporjoy cyclone) सध्याच्या होत असलेल्या मार्गक्रमणामुळे बुधवारपासुन आगामी तीन दिवस म्हणजे शुक्रवार १६ जूनपर्यंत मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू, तलासरी, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाण, कळवण, सटाणा व संपूर्ण खान्देश भागात ढगाळ वातावरणासहित ताशी ३५ ते ४० किमीपर्यंतच्या वाऱ्यासहित किरकोळ ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. मुंबई ठाणे परिसरात उन्ह पावसाचा खेळ सुरु राहणार आहे. यातून दमटपणा अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here