मोबाईल बील वेळेवर भरणारे वीज बील का भरत नाही? – महावितरण

वीज बिलाची थकबाकी ७३ हजार कोटींवर

अखंड वीजपुरवठ्यासाठी बिल भरण्याचे आवाहन

By Anant Nalavade

Twitter: @maharashtracity

मुंबई: सुमारे ७३ हजार कोटी रुपयांची थकीत वीज बिल वसुलीचे आव्हान असलेले महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी आज केलेल्या आवाहनात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. विजय सिंघल यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार तीन लाखाहून अधिक कृषीपंप धारक शेतकऱ्यांनी गेल्या १५ वर्षात एकदाही वीज बिल भरलेले नाही. तर १५ लाखाहून अधिक कृषीपंप धारकांनी गेल्या पाच वर्षात एकदाही वीज भरलेले नाही.

मुंबई उपनगरसह राज्याच्या बहुतांश भागात वीज पुरवठा करणाऱ्या महावितरण (Mahavitaran) कंपनीची ग्राहकांकडील वीज थकबाकी (dues of electricity bills) आता ७३ हजार ३६१ कोटी रुपयांवर पोहचली आहे. ही प्रचंड थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.

ग्राहकांना थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन करताना कंपनीचे अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, महावितरणकडून शेतकऱ्यांना (farmers) खूप मोठ्या सवलतीच्या दरात वीजपुरवठा होतो. तरीही राज्यातील १५ लाख १९ हजार कृषीग्राहकांनी गेली पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकही बिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे २१ हजार ६७ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ३ लाख २३ हजार असे कृषीपंपधारक ग्राहक (Agri Pump user farmers) आहेत ज्यांनी गेली पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ एकही वीजबिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे ५ हजार २१६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

महावितरण ग्राहकांना केवळ वापरलेल्या विजेचे पैसे बिलाच्या स्वरुपात आकारते. जी सेवा वापरली आहे त्याचे बिल देण्यास कोणी विरोध करेल अशी शक्यता नाही. काही ग्राहक मोबाईल, डीटीएच, केबलचे बिल अशी बिले नियमित भरत असताना त्यांच्यासाठी अत्यावश्यक सुविधा असलेल्या विजेचे बिल भरण्यास टाळाटाळ करतात हे आश्चर्यकारक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

महावितरणची एकूण उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होत असल्याने अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषीग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असेही सिंघल म्हणाले.

महावितरणसुद्धा एक ग्राहक असून इतरांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवते. महावितरण स्वतः वीजनिर्मिती करत नाही किंवा कंपनीला कोणाकडून मोफत वीज मिळत नाही. सन २०२१-२२ या गेल्या आर्थिक वर्षात महावितरणने वीजखरेदीपोटी ६९ हजार ४७८ कोटी रुपये खर्च केले होते, याकडे सिंघल यांनी लक्ष वेधले.

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. पाणी पुरवठा, रुग्णालयांचे काम, इमारतीतील लिफ्ट, वाहतूक नियंत्रण, कार्यालयांचे कामकाज, बँकिंग अशा अनेक सेवा या वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी अखंड वीजपुरवठा करायचा तर महावितरणला वीज खरेदी करण्यासाठी पैसे उभे करणे आवश्यक आहे. महावितरणकडे बिलांच्या माध्यमातून पैसे आले तरच कंपनीला वीज खरेदी करणे आणि ती ग्राहकांना पुरविणे शक्य आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिले भरण्यास प्राधान्य द्यावे आणि वेळेत वीजबिले भरावीत, असे आवाहनही सिंघल यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here