अवघ्या १९ दिवसात एक लाख जणांची भर

Twitter : @maharashtracity

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना लाभार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत असून २२ फेब्रुवारी रात्रीपर्यंत म्हणजे अवघ्या १९ दिवसांच्या कालावधीत आणखी एक लाख लाभार्थ्यांची यामध्ये भर पडली आहे. आता आपला दवाखान्यांच्या लाभार्थ्यांची संख्या ४ लाख ०५ हजार ४२६ इतकी झाली आहे. दरम्यान मुंबईत आजघडीला १०७ ठिकाणी हे दवाखाने कार्यरत असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana) योजनेचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईत सध्या १०७ ठिकाणी आपला दवाखाने कार्यरत आहेत. ही योजना सुरु झाल्यानंतर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १ लाख लाभार्थी संख्या पूर्ण झाली होती. त्यानंतर १ महिना ७ दिवसांनी म्हणजे दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी २ लाख लाभार्थी टप्पा गाठण्यात आला. तर त्यापुढे २६ दिवसांनी म्हणजे दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी ३ लाखांच्या पार लाभार्थ्यांची संख्या पोहोचली. आता त्याहीपुढे जात अवघ्या १९ दिवसांत ४ लाख लाभार्थ्यांचा टप्पा पार झाला असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. आरोग्य सुविधा घेणाऱ्यांची संख्या सतत वाढत असून २२ फेब्रुवारी पर्यंत एकूण ४ लाख ०५ हजार ४२६ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी दवाखान्यांमधून ३ लाख ८९ हजार ८३३ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १५ हजार ५९३ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच सुचना केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

एकट्या जी उत्तर विभागात १ लाखांहून अधिक संख्या :

पालिकेच्या जी उत्तर विभागात एकूण १५ आपला दवाखाने आणि २ डायग्नोस्टिक केंद्र (diagnostic Centre) अशा १७ ठिकाणी आरोग्य सेवा पुरवली जात आहे. या १७ दवाखान्यांमधील लाभार्थ्यांची संख्या तब्बल १ लाख ०४ हजार ७४६ इतकी झाली आहे. जी उत्तर विभागामध्ये धारावी सारखा झोपडपट्टी बहुल, घनदाट लोकसंख्येचा परिसर समाविष्ट आहे.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here