Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबई शहराला प्रदुषणाने झाकोळून महिना उलटला तरीही अद्याप प्रदुषण कमी होत नसल्याचे मंगळवारी “सफर” प्रकल्पाने केलेल्या हवा दर्जा निर्देशांकाच्या नोंदीवरून समोर आले. त्यात बीकेसीतील हवा दर्जा निर्देशांकाने सीमा ओलांडली आहे. बीकेसीतील हवा दर्जा निर्देशांक ३६२ एवढा नोंदविण्यात आला. हा निर्देशांक अत्यंत वाईट दर्जातील असून या ठिकाणी घराबाहेर पडणे टाळा, असा इशारा “सफर” या हवा दर्जा नोंदी प्रकल्पाकडे देण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी सूंपर्ण मुंबई शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक ३०४ एवढा नोंदविण्यात आला असून हा अतिशय वाईट वर्गातील आहे. या दर्जाच्या प्रदुषणाने प्रत्येकाच्या आरोग्यावर वाईट हवेचा परिणाम होऊ शकतो. तसेच श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. तर नवी मुंबई परिसराचा हवा गुणवत्ता निर्देंशाक ३२८ एवढा व मुंबईहून किंचित अधिक नोंदविण्यात आला. येथील हवा देखील अतिशय वाईट दर्जातील असून या ठिकाणी प्रत्येकाला आरोग्याचा इशारा देत हवेचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

नवी मुंबईतही श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या खालोखाल चेंबुर येथील हवा दर्जा निर्देशांक ३२४ एवढा असून हे ही प्रदुषणासाठी अतिशय वाईट असल्याचे सांगण्यात आले. हे वायू प्रदुषण आरोग्यासाठी इशारा देत असल्याचे “सफर”कडून सांगण्यात आले. याचा प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात त्रास होऊ शकतो. तसेच बाहेर फिरणे टाळा आणि मास्क वापरा असे सुचविण्यात आले आहे.

भांडूप येथील हवा दर्जा निर्देशांक ३१५ एवढा असून अतिशय वाईट दर्जाची हवा असल्याने या ठिकाणी प्रत्येकाला त्रास होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. अंधेरी येथील हवा दर्जा निर्देशांक २८० असून वाईट वर्गात मोडत आहे. यामुळे वृद्धांना त्रास होणार असून आरोग्यदायी लोकांना ही किंचित त्रास होण्याची शक्यता सांगण्यात आली. तर बोरिवली येथील हवा गुणवत्ता निर्देशांक २२८ एवढा असून वाईट दर्जात आहे. येथे संवदेनशील लोकांना आरोग्य इशारा देण्यात आला. येथील वृद्धांना तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या लोकांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. 

मालाड येथील हवा दर्जा निर्देशांक २२१ इतका वाईट दर्जातील असून वृद्धांना धोका असल्याचे सांगण्यात आले. तर कुलाबा येथील हवा दर्जा निर्देशांक २१८ असून वाईट दर्जातील आहे. येथील सदृढ लोकांना थोडा त्रास सहन करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले. तर माझगाव येथील हवा दर्जा निर्देशांक २११ असून येथील हवा वाईट दर्जात मोडते. वृद्धांना त्रास, आरोग्यदायी लोकांना किंचित त्रास होणार असल्याचे सांगण्यात आले. वरळी येथील हवा दर्जा निर्देशांक १६९ नोंदविण्यात आला असून हा निर्देशांक मध्यम गटात मोडतो. येथील संवदेनशील लोकांना किंचित आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here