वडाळा विधानसभेतील शिवसैनिक शिंदे गटात सामील
Twitter: maharashtracity
मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख हरेश शिवलकर यांनी शिवसैनिक कार्यकर्त्यांसोबत बाळासाहेबांची शिवसेना या शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना वडाळा विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दक्षिण मुंबईतून पहिल्यांदाच शिवसेना उद्धव ठाकरे गटातील शाखा प्रमुखांसोबत कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईतील आणखी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, आम्हा कार्यकर्त्यांकडे कोणीही लक्ष देत नव्हते. आमच्या मागण्यांचा ही कोणीही विचार करत नव्हते. यामुळे तीन वर्षांपूर्वी आम्ही शिवसेना पक्षातील पदांचा राजीनामा दिला होता. पण शिवसेना पक्षातील होणारी गळती पाहता पक्ष बांधणीसाठी मागील सात महिन्यांपासून पुन्हा पक्षात सक्रियपणे काम करण्यासाठी आम्ही तगादा लावला होता. मात्र, आमची कोणीही दखल घेत नव्हते. साधी विचारपूस ही कोणी करत नव्हते. अखेर माझ्या सोबत वडाळा विधानसभेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला, असे शिवलकर यांनी सांगितले.
शिवलकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सोमवारी आमदार सदा सरवणकार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शिंदे गटात सामील झाले. यावेळी त्यांना वडाळा विधानसभेच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली.