Twitter: @maharashtracity

मुंबई: मानसिक आजाराने ग्रस्त मुंबईकरांचे सर्वेक्षण मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी महानगरपालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. 

या सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरने निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तिंची घरोघरी जाऊन सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेण्यात येईल. सप्टेंबर २०२३ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. मानसिक आजारांचे (mental illness) प्रमाण ठरवून त्याआधारे मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करणे, यासाठी हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे, असे पालिकेच्या (BMC) आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशातील पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण सन २०१५-१६ मध्ये करण्यात आले होते. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान या संस्थेची मध्यवर्ती समन्वय केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. 

या सर्वेक्षणात देशातील १२ राज्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार, मनोविकारांचे आजीवन प्रमाण हे शहरी भागात १४ टक्के तर ग्रामीण भागात १० टक्के इतके आढळले होते. ज्यात चिंता (नर्व्हस्), नैराश्य (मूड डिसऑर्डर), अति मद्य सेवन यांचा समावेश होता. यातील बहुतेक आजारांसाठी उपचारांची गरज व प्रत्यक्ष उपलब्धता यातील तफावत ६० टक्क्यांहून अधिक आढळली होती. 

औषधे, मानसोपचारतज्ञ, मानसशात्रज्ञ व मानसोपचार परिचारिका यांची मोठी कमतरता या सर्वेक्षणदरम्यान सर्वच राज्यांमध्ये आढळून आली होती.

पहिल्या सर्वेक्षणामध्ये आढळलेली ही निरीक्षणे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील महानगरांमधील परिस्थिती जाणून घेण्याचा उद्देशाने दुसरे सर्वेक्षण हाती घेतले आहे. मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरु, चेन्नई व कोलकाता या महानगरांमध्ये हे सर्वेक्षण राबवण्याचे निश्चित केले आहे. 

मुंबईतील सर्वेक्षणासाठी पालिकेच्या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाची (Nair Hospital) निवड करण्यात आली आहे. नायर रुग्णालयाचा मनोविकृतीशास्त्र विभाग व जनऔषध वैद्यकशास्त्र विभाग यांनी संयुक्तपणे हे सर्वेक्षण नुकतेच सुरु केले आहे. यासाठी वस्ती पातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी १ मुख्य समन्वयक आणि ७ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here