By Sachin Unhalekar
Twitter: @Sachin2Rav
मुंबई: भायखळा पूर्व परिसरातील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानाच्या परिसरात आयोजित उद्यान प्रदर्शनाचे खरे “पुष्प शिल्पकार” हे मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर आणि त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी आहेत. उद्यान प्रदर्शन पाहून प्रत्येक वृक्ष प्रेमी वाह ! वाह ! करु लागले आहेत.
तीन दिवसांचे उद्यान प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी मागील 8 महिन्याची या पुष्प शिल्पकारांची मेहनत असून शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस मिळून लाखों वृक्ष प्रेमींनी उद्यान प्रदर्शनाला भेट दिलेली आहे. यातच या पुष्प शिल्पकारांचे यश दिसून येते. उद्या रविवारी उद्यान प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून लाखो वृक्ष प्रेमी प्रदर्शनाला भेट देतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेच्या उद्यान प्रदर्शनाचे यंदाचे 26 वे वर्ष असले तरी खऱ्या अर्थाने भोईर यांच्या संकल्पनेवर आधारित उद्यान प्रदर्शन हे मागील 12 वर्षांपासून नावारुपास आले. सेल्फी पॉईंट, माझी मुंबई, डीझनी कार्टून अशा अनेक थीम लाईन भोईर यांच्या गाजल्या आहेत. त्यामुळे भोईर यांची थीम आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची मेहनत हेच उद्यान प्रदर्शन यशस्वी होण्यामागील एक समीकरण आहे.
यंदा भोईर यांच्या “कार्टून”च्या संकल्पनेने उद्यान प्रदर्शन बहरले आहे. कार्टूनची थीम ही सुमारे 36 हजार फुलांच्या झाडांनी फुलविण्यात आलेली आहे. फुलझाडांमध्ये सदाफुली, अस्टर, शेवंती, झेंडू, पिटोनिया, गजेनिया, डायांथस आदी फुलांचा समावेश आहे. पेपापीग कार्टून कुटुंबीयाची व्यक्तिरेखा शेवंतीपासून तयार करण्यात आले आहे. तर ब्लूई आणि बिंगो या कुत्र्याची जोडी ऑरकीट आणि बेझी या फुलांपासून तसेच माशासोबत अस्वल हे शेवंती पासून साकारण्यात आलेले आहे.
विशेष म्हणजे, पावसात उमळून पडणाऱ्या झाडांच्या लाकडांपासून येथे विविध कार्टून तयार करण्यात आलेले आहेत. तसेच बाग कामात वापरल्या जाणाऱ्या कैची आणि अन्य अवजारांपासूनही येथे विविध पक्षी तयार करण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने येथे येणारा प्रत्येकाजण कार्टूनच्या जगाची सफर करत आहे.
“एखादी थीम सुचली की ती प्रत्यक्ष फुलांमध्ये साकारण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. थीममधील व्यक्तिरेखा तसेच एखादे ठिकाण साकारण्यासाठी त्याला साजेशी अशी फुल कोणती उपयोगी पडतील. मग ती फुल तीन दिवस टिकतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्याची उत्तरे शोधत पुढे त्याप्रमाणे काम करावे लागते. त्याकरिता दिवस रात्र ही काम करावे लागते. अशावेळी घर ही विसरावे लागते. उद्यान प्रदर्शन जरी 3 दिवसांचे असले तरी आम्ही मुलुंड येथील नर्सरीमध्ये 8 महिने प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत असतो. येथेच आम्ही नानाविविध फुलांची बाग फुलवतो. ही बाग वृक्ष प्रेमींना प्रदर्शनात पाहता येते”, असे भोईर यांनी सांगितले.
कोणत्याही खासगी एजन्सीच्या मदतीशिवाय भोईर यांच्यासोबत राजू डगळे, जगन्नाथ आमटे, तुकाराम घबाले आणि सुनील घागससोबत अन्य कर्मचारी उद्यान प्रदर्शन साकारले आहे.
“आज प्रत्येकजण प्रदर्शन पाहून वाह ! वाह ! करु लागले आहेत. येथे येऊन सेल्फी काढत आहे. फोटो काढत आहे. येथील फोटो हे त्यांच्या डीपीवर किमान महिनाभर तरी राहतील. आज कोरोनाच्या संकटातून मुक्त होऊन येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आम्ही हास्य फुलवत आहे. हेच आमच्या कामाचे यश आहे,” अशी प्रतिक्रिया या पुष्प शिल्पकारांनी व्यक्त केली.