एका दिवसात ९६१ नवीन रुग्ण
@maharashtracity
मुंबई: मुंबईत बेफिकीर लोकांमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेला (possible fourth wave of Corona) जणू निमंत्रणच मिळाले आहे. त्यामुळेच एका दिवसात कोरोनाबाधित ९६१ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या ९६१ रुग्णांपैकी ९१७ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत. तर ४४ रुग्णांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या ४४ पैकी ४ रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत.
दरम्यान, कोरोनाबाधित एका रुग्णाचा (corona patients) मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या १९ हजार ५६९ वर पोहोचली आहे. त्यामुळे आता शासन व मुंबई महापालिका (BMC) प्रशासन कोरोनाबाबत अधिक अलर्ट झाले आहे.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु राज्य शासनाने व पालिकेने अद्यापही ‘मास्क सक्ती’ केलेली नाही. मात्र, काही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे व बेफिकिरीमुळे इतका कोरोनाचा संसर्ग हळूहळू अधिक पसरू लागला आहे. परिणामी कोरोना रुग्ण संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
राज्य शासन व पालिका आरोग्य यंत्रणेच्या अधिक मेहनतीमुळे व योग्य नियोजनांमुळे मार्च २०२० पासून मुंबईत पाय रोवून बसलेल्या कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेवर यशस्वी उपचारामुळे नियंत्रण मिळवता आले. मात्र, पुन्हा एकदा हलगर्जीपणा झाला. कोरोनाला पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, ३७४ कोरोनाबाधित रुग्णांनी यशस्वी उपचारानंतर अखेर कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १० लाख ४५ हजार ४०९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ४,८८० सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के असून रुग्ण वाढीचा दर ०.०५७ टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १,२०४ दिवसांवर पोहोचला आहे.