By Sachin Unhalekar

Twitter: @Sachin2Rav

मुंबई : मुंबई महापालिका सुरक्षा दलाचा बुधवारी 57 वा वर्धापन दिन साजरा करताना मनुष्यबळ कमतरतेमुळे केवळ चार लोक बॅण्ड पथक वाजविणार आहेत. दरवर्षी 10 ते 8 संचलन पथकांची मानवंदना असताना यंदा केवळ चारच संचलन पथकांची परेडद्वारे मानवंदना दिसणार आहे.

इतक्या कमी मनुष्यबळमध्ये वर्धापन दिन साजरा करण्याची नामुष्की केवळ गेले दहा ते बारा वर्षे सुरक्षा दलात न केलेल्या नवीन भरतीमुळे ओढवलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षभरात तरी महापालिकेच्या सुरक्षा विभागात (BMC Security Department) भरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही तर पुढील वर्षीच्या सुरक्षा दलाच्या (Security Guards) वर्धापन दिनी बॅण्ड पथकात तर कोणी वाजवताना दिसणार नाहीच आणि संचलन पथक ही दिसणार नाही. अशी जर नामुष्की ओढवली तर नवल वाटायला नको, असे स्पष्ट मत सुरक्षा विभागातील अधिकारी आणि कर्मचारी व्यक्त करत आहे.

सध्या सुरक्षा विभागात सुरक्षा रक्षक पदाची 1715 पदे रिक्त आहेत. तर 2194 सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. याप्रमाणे मुख्य सुरक्षा रक्षक आणि जमादार यांची ही पदे रिक्त आहेत.

कमी मनुष्यबळामध्ये याच सुरक्षा रक्षकांकडून महापालिकेच्या इमारती, रुग्णालये, मालमत्ता, धरणे, जलवाहिन्यांचे रक्षण करण्याचे काम करुन घेतले जाते. मनुष्यबळ कमतरतेमुळे (lack of manpower) सतत ओव्हर टाइम केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यात रिलिव्हर त्यांना मिळत नाही. बूट आणि गणवेष ही वेळेवर मिळत नसून गणवेषांचा दर्जाही चांगला नसल्याची तक्रार सुरक्षा रक्षकांकडून होत असली तरी त्याकडे कोणी लक्ष देत नाही, असे ही सुरक्षा रक्षक सांगतात.

मनुष्यबळ कमतरता असूनही भरती प्रक्रिया मागील दहा ते बारा वर्षे न राबविण्यात आल्यानेच मुंबई महापालिकेच्या सुरक्षा दलाच्या 57 व्या वर्धापन दिनी बॅण्ड पथकात चारच माणसे दिसत आहे. सोबत चारच संचलन पथक राहिले आहेत. त्यामुळे आता तरी पालिका प्रशासन सुरक्षा रक्षक दलात भरती प्रक्रिया राबविण्यात येणार का? असा प्रश्न अधिकारी आणि सुरक्षा रक्षक विचारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here