Twitter: @maharashtracity

मुंबई: जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील चतुर्थ, तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून बुधवारी संपाचा दुसरा दिवस हाेता. बुधवारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अधिक तीव्र केले. आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बुधवारी मुंबईतील रुग्णसेवा बाधित झालेली दिसली. 

राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेली मुंबईतील कामा, जे.जे., सेंट जाॅर्ज व गाेकुळदास तेजपाल या चारही गजबजलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामाकाजाकडे पाठ फिरवल्याने रुग्णालयात रुग्णसेवा विस्कटल्याचे चित्र होते. 

दरम्यान, सकाळी सुरु हाेणाऱ्या ओपीडी करीता लिपिक तसेच इतर कर्मचारी नसल्याने रुग्ण व नातेवाईक दुपारपर्यंत ओपीडी बाहेर ताटकळत उभे असल्याचे चित्र दिसून आले. रुग्णालयात नर्सेस नसल्याने दिवसभर रुग्णसेवेवर चांगलाच परिणाम झाला हाेता. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरुपात साफसफाई कर्मचारी, शिकाऊ डाॅक्टर तसेच काही वरिष्ठ डाॅक्टरांच्या अतिरिक्त सेवा लावण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे रुग्णसेवा सुरु हाेती.  

मात्र, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचे काही वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी सरकारी रुग्णालयात काही किरकाेळ शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असल्याची माहिती मिळत आहे. 

” गेले 17 वर्षे प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार व चर्चा झाली. आम्ही शासनाला वारंवार कळवलेले असतानाही शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शासनाने आजवर आमचे प्रश्न गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. रुग्णांना वेठीस धरणे हे आमचं काम नाही. परंतु प्रशासन जाणीवपूर्वक आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. आमची एकच मागणी आहे. आम्हाला जुनी पेन्शन लागू करण्यात यावी. या पेन्शन संदर्भात शासनाशी चर्चा झाली. परंतु, समिती नेमणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले, पेन्शन मिळण्याबाबत लेखी आश्वासन द्यावे. अन्यथा संप सुरूच राहणार.

– कृष्णा क्षीरसागर, सचिव, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभाग बदली कर्मचारी संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here