दहावी बारावी विद्यार्थी पालक संघटनेचे शिष्ट मंडळ राज दरबारी

Twitter : @maharashtracity

मुंबई: इयत्ता दहावी, बारावी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्याची सुविधा यंदापासून रद्द करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला. मात्र, या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी आणि विद्यार्थ्यांना पूर्ववत दहा मिनिटांचा कालावधी देण्यात यावा, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे. या मागणीचे निवेदन घेऊन पालकांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

दरम्यान, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान (board examination) प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या घटना किंवा अफवा दरवर्षी घडत असतात. अशा घटनांना आळा बसून परिक्षा निकोप सुरळीत पार पडण्यासाठी देण्यात येणारा दहा मिनिटांचा कालावधी यंदापासून रद्द करण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला होता. मात्र, हा वेळ द्यावा अशी मागणी दहावी – बारावीतील विद्यार्थ्यांचे पालक करत आहेत. यावर बोलताना एका पालकाने सांगितले की, कोविड काळात जे फायदे देण्यात येत होते, त्यानुसार दहा मिनिट आधी प्रश्न पत्रिका दिली जात होती. ती पूर्ववत करावी, अशी मागणी करायला आम्ही राज ठाकरे यांची भेट घेतली. १७ लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न असल्याने राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला तसेच मंत्री महोदयांना दहा मिनिटे वेळ पूर्ववत करण्याची विनंती करावी अशी मागणी घेऊन पालक राज यांना भेटले.

कोविड काळात मुलांच्या अनेक क्षमता विकसित होऊ शकल्या नाहीत. त्यातून त्यांचा पेपर पूर्ण लिहून होत नाही. त्यामुळे याही वर्षी विद्यार्थ्यांना पेपर दहा मिनिट आधी देण्यात यावा, या मागणीसाठी राज ठकारेंना आम्ही भेटायला आलो असल्याचे एका पालकाने सांगितले. तर दुसऱ्या एका पालकाच्या मते कोविड काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग कमी झाला आहे. त्यातून विद्यार्थी ८० टक्के पेपर लिहू शकतात. तर २० टक्के लिहायचा राहून जातो. त्यामुळे पाल्यांना पूरक वेळ मिळावा. त्यातून कोविड काळात जो वेळ दिला जात होता तो वेळ मिळावा. यातून दहा मिनिटे पेपर आकलन करतील व उर्वरित वेळ पेपर सोडवायला उपयोगी पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here