@maharashtra.city

यंत्रणेला दक्ष राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबई: मुंबई शहरातील बुधवारी कोविड दैनंदिन रुग्णसंख्या ७३९ एवढी होती. त्यामुळे पालिका आयुक्तांनी पालिका यंत्रणेला दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कोविडसंबंधित असलेली त्रिसुत्री पाळण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत. दरम्यान, मुंबईतील पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातही कोविड रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे.

दरम्यान, सेव्हन हिल्स रुग्णालयात मे महिन्यात आयसीयू विभागात ६ ते ७ रुग्ण दाखल होते. आता मात्र ही संख्या ९ वर गेली आहे. मुंबई महानगरपालिकेने सेव्हन हिल्स हे रुग्णालय कोविड समर्पित राखून ठेवले आहे. याठिकाणी सध्या ४२ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ३२ रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये आहेत. ज्यांना पाच ते सहा दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल.

मात्र ९ रुग्ण हे आयसीयूत जे कोविडसह सहव्याधी आणि ज्येष्ठ वयाचे असल्याने त्यांना बरे होण्यासाठी वेळ लागत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तसेच, जवळपास ३ रुग्ण ऑक्सिजनसह व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे, ही संख्या कमी असली तरी हा धोका त्रिसूत्री पाळून टाळता येऊ शकतो असे सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश

मुंबईत रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेला आणि सर्व संबंधित विभाग व खात्यांना दक्ष राहण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा खंबीरपणे सामना करतानाच मुंबई महानगरात कोविड प्रतिबंधक लसीकरण देखील वेगाने करण्यात आले आहे.

सर्व पात्र घटकांपर्यंत लसीकरण मोहीम पोहोचल्याने कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव अतिशय सौम्य स्तरावरच रोखण्यात महानगरपालिकेला यश आले. सद्यस्थितीत जगातील विविध देशांमध्ये कोविडचे नवीन उपप्रकार आढळले असून संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला व सर्व संबंधित खाते, विभाग यांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

यात कोविड चाचण्या युद्धपातळीवर वाढवाव्यात. त्यासाठी सर्व वैद्यकीय प्रयोगशाळा मनुष्यबळासह सुसज्ज असाव्यात, १२ ते १८ वर्षे वयोगटातील कोविड लसीकरणास वेग द्यावा. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस घेण्यास पात्र नागरिकांना देखील लस घेण्यास प्रवृत्त करावे. जम्बो कोविड रुग्णालयांनी सतर्क राहावे आणि तेथे पुरेशा संख्येने मनुष्यबळ तैनात राहील, याची खातरजमा करावी. वॉर्ड वॉर रूममध्ये पुरेसे वैद्यकीय कर्मचारी, इतर कर्मचारी आणि रुग्णवाहिका उपलब्ध राहतील, यादृष्टीने आढावा घ्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here