X: @maharashtracity

मुंबई: सर ज.जी. कला महाविद्यालय ही दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था असून येत्या १२ मार्च ते दि. १७ मार्च २०२४ सकाळी १०. ३० ते संध्याकाळी ७. या कालावधीमध्ये महाविद्यालयाचे वार्षिक कला प्रदर्शन सर्व रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.
सर्वानी या प्रदर्शनासाठी आवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

२ मार्च रोजी सर ज.जी. कला महाविद्यालय संस्था १६८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. भारतातील दृष्य कलेच्या क्षेत्रात या संस्थेचे खूप मोठे योगदान आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार ,शिल्पकार व संकल्पनाकार या संस्थेमधून निर्माण झाले आहेत.

या संस्थेमध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवीचे चित्रकला शिल्पकला, मातकाम, धातूकाम, अंतर्गत गृहसजावट,वस्त्र संकल्प व कला शिक्षक प्रशिक्षण हे अभ्यासक्रम शिकविले जातात. या सर्व विभागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई मधील विद्यार्थ्यांबरोबरच महाराष्ट्राच्या ग्रामीण व दुर्गम भागातून तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले जवळपास ५३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

वार्षिक कला प्रदर्शन हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्वाचा उपक्रम असून या मध्ये प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्टच कलाकृती निवडून त्या प्रदर्शित केल्या जातात. संकल्पनेच्या पातळीवर व तंत्राच्या बाबतीत नाविन्यपूर्ण वर्गकाम करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. या पारितोषिकांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते व ते आणखी आत्म विश्वासाने काम करतात .या प्रदर्शनातील कलाकृती पाहून व्यावसायिक कंपन्या द्वारे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जातात त्या साठी ह्या प्रदर्शनाचे महत्व वेगळे आहे.

या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली व्यक्तिचित्र निसर्ग चित्र, स्थिर चित्र प्रदर्शित केली आहेत त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित विविध पद्धतीने चित्र रंगविलेली आहेत.

शिल्पकला विभागामध्ये व्यक्ती शिल्प व रचना शिल्प ही फायबर ,लाकूड, वेगवेगळ्या प्रकारचे दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविलेल्या आहेत.

धातू काम विभागातील विद्यार्थ्यांनी तांब्याचा पत्रा, विविध पद्धतीने ठोकून व वेगवेगळे उठाव निर्माण करून विविध कलाकृती तयार केल्या आहेत ज्वेलरी तसेच विविध कलात्मक वस्तू व उठाव शिल्प यांचा समावेश आहे.

त्याच बरोबर सिरॅमिक च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मातींचा वापर करून नाविन्यपूर्ण भांडी व शिल्प तयार केली आहेत.

इंटेरिय च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फर्निचर, व इंटेरियर ची डिझाईन तयार करून त्यांची मॉडेल या प्रदर्शनामध्ये सादर केली आहेत.

टेक्स्टाईल या विभागातील विद्यार्थ्यांनी विव्हिंग व प्रिंटिंग पद्धतीने कार्पेट, बेडशीट,पडदे,साडी,ड्रेस इत्यादी वर नावीन्यपूर्ण डिझाईन केलेली पहावयास मिळतील याचबरोबर कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यां ची ही कामे यात प्रदर्शित करण्यात आली आहेत

सर जेजे स्कुल ऑफ आर्ट च्य मुख्य इमारतीतील तळमजला तसेच पहिला मजला व रे आर्ट वर्कशॉप या इमारती मध्ये हे संपूर्ण प्रदर्शन लावण्यात आले आहे .

या वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ ११ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित केला आहे . या प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहाच्या अभ्यासक व लेखिका डॉ.फिरोजा गोदरेज व संस्थेचे माजी विद्यार्थी व चित्रकार विलास शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे.

१२ मार्च रोजी संध्याकाळी ६.वा विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन शो चे आयोजन केले आहे.

१३ मार्च रोजी संध्याकाळी ६.वा प्रशिध्द शास्त्रीय संगीत गायिका -श्रुती सडोलीकर यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहेत . या साठी सर्वाना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल.

१६ मार्च रोजी कलावेध चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.

कलारसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी योग्य क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here