Twitter: @maharashtracity
मुंबई: टाटा मेमोरियल रुग्णालयाने (Tata memorial hospital) शहरातील तीन बाल रुग्णालयासोबत अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी भागीदारी करार केला आहे. यामुळे आता टाटा रुग्णालयाच्या प्रत्यारोपण दरात तीन रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे प्रत्यारोपण आवश्यक असलेल्या कर्करोगग्रस्त मुलांची (cancer patients) प्रतीक्षा आता संपणार असल्याचे सांगण्यात आले.
टाटाने रुग्णालयाने वाडिया रुग्णालय (Wadia Hospital), बोरिवलीतील कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर आणि हाजी अली येथील एसआरसीसी रुग्णालयासोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, ही तिन्ही रुग्णालये टाटा रुग्णालयांप्रमाणेच (Tata Hospital) किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या रुग्णांसाठी धर्मादाय निधी उभारून बोन मॅरो ट्रान्सप्लांट (Bone marrow Transplant) करतील. प्रत्यारोपणासाठी रुग्णाला आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो.
यावर बोलताना टाटा रुग्णालयाच्या बालरोग ऑन्कोलॉजी विभाग डॉ. गिरीश चिन्नास्वामी यांनी सांगितले की, रूग्णांच्या वाढत्या भारामुळे रुग्णालयात सर्व प्रकारच्या उपचारांसाठी लांबलचक प्रतीक्षा यादी आहे. दरवर्षी २०० रूग्ण निव्वळ बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी या ठिकाणी नोंदणी करत असल्याचे डॉ. चिन्नास्वामी यांनी सांगितले. तर टाटा रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. एस बनावली यांनी ल्युकेमिया किंवा लिम्फोमासारख्या विशिष्ट प्रकारच्या रक्त कर्करोगाच्या (blood cancer) रूग्णांना अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची गजर असल्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णालयात दरवर्षी सुमारे १०० रुग्ण बोन मॅरो प्रत्यारोपण करतात. ज्यामध्ये ७० ते ७५ रुग्ण तरुण वयोगटातील असतात.
प्रत्यारोपणाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी, टाटा रुग्णालयाने इतर प्रत्यारोपण रुग्णालयांसोबत भागीदारी केली असल्याचे सांगितले. वाडिया रुग्णालयाच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले की, वाडिया रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी तज्ज्ञ असून ज्या मुलांचे कुटुंब खाजगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही अशा मुलांना मदत करण्याची खूप गरज आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाने सुचविलेल्या मुलांसाठी निधीची व्यवस्था केली आहे.
टाटा रुग्णालयात प्रत्यारोपण आवश्यक असलेल्या १४१ पैकी ९३ आमच्या केंद्रात २०१८ ते २०२१ या कालावधीत करण्यात आले असल्याचे डॉ. बोधनवाला यांनी सांगितले. तर बोरिवलीच्या सीटीसी रुग्णालयाच्या डॉ. ममता मंगलानी यांनी टाटा मेमोरियल रुग्णालयात बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी येणाऱ्या ७० टक्के मुलांचे व्यवस्थापन आम्ही करत असल्याचे सांगितले.
विनामूल्य यकृत प्रत्यारोपणाची व्यवस्था
टाटा मेमोरियल रुग्णालयात पाच ते सहा मुले इतकी गंभीर हिपॅटोब्लास्टोमा (तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळणारा यकृत कर्करोगाचा प्रकार) आढळतात. त्यांना केमोथेरपीसह यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. केमोथेरपीच्या चार फेऱ्या पूर्ण केल्यानंतर या मुलांना प्रत्यारोपणाची गरज असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. गिरीश चिन्नास्वामी यांनी सांगितले. यासाठी एक कमी विंडो कालावधी असून यात त्यांना प्रत्यारोपण करावे लागते आणि नंतर केमोथेरपीच्या दोन अतिरिक्त फेर्यांसाठी तयारी करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.