संकटाच्यावेळी मदत करणाऱ्या आपदा मित्रांचे केले कौतुक

Twitter: @the_news_21

मुंबई: करीरोड रेल्वे स्थानकाजवळ एका दुचाकीला अपघात होतो. अपघातात २ व्यक्ती जखमी झालेल्या असतात. पैकी एकाच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात होते. तर दुसऱ्या व्यक्तिच्या पायाला मोठा मार आहे. बहुदा पायाचं हाड मोडलेलं असावं. शेजारुन जात असलेल्या काही तरुणांची फळी क्षणाचाही विलंब न करता जखमींच्या मदतीला येतात. मदतीला धावून आलेले सगळे आपदा मित्र असतात. नुकतेच मुंबई महानगरपालिकेने आपत्कालीन स्थितीत काय करावे आणि काय करू नये याचे निवडक लोकांना प्रशिक्षण दिले. तेच हे आपदा मित्र. मदतीला धावून आलेल्या सर्व आपदा मित्रांचे पालिकेकडून कौतुक करण्यात आले.

दरम्यान, अपघात झालेल्या ज्या व्यक्तीच्या नाकातून रक्त येत असतं, त्याला मान खाली करुन नाक विशिष्ट पद्धतीने धरायला सांगितले जाते. तर त्याचवेळी दुसऱ्या जखमी व्यक्तिच्या पायाला आधार देण्याची गरज असते. अशावेळी प्रसंगावधान राखत एका बॅनरची काठी काढून व ती योग्यप्रकारे तोडून पायाला आधार मिळेल, अशा पद्धतीने बांधतात. हे मदतकार्य सुरु असतानाच त्यांच्यापैकी एक तरुण १०८ क्रमांकावर संपर्क साधतो. तर दुसरी व्यक्ती पोलिसांना कळविते. पोलिसांची गाडी येताच त्या गाडीतील स्ट्रेचरचा उपयोग करुन जखमींना गाडीत ठेवून रुग्णालयात उपचारार्थ पाठविले जाते. 

अल्पावधीत केलेल्या या मदतकार्यामुळे जखमींना वेळच्यावेळी उपचार मिळण्यास मदत होते. प्रसंगावधान राखून मदत करणारी असते, महाविद्यालयीन विद्यार्थीनी रुद्राक्षा होडगरे आणि तिच्यासोबत असतात सर्वश्री आप्पा मनोहर माने, मनिष लाड, विनित जाधव, निखिल परब, अजय लोकरे आणि तन्मय कुसळे अशी टिम.

जखमींना मदत करणारी ही सगळी मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असली, वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकत असली किंवा वेगवेगळ्या व्यवसायात असली; तरी ते सर्व ‘आपदा मित्र’ असतात.

महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे जानेवारी २०२३ पासून नियमितपणे १२ दिवसांचे ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार देण्यात येत असलेल्या या ‘आपदा मित्र’ प्रशिक्षणामध्ये विविध आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन करण्याचे धडे प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिकांसह देण्यात येत आहे.

या अंतर्गत प्रामुख्याने विविध प्रकारच्या आपत्तींनुसार द्यावयाचे प्रथमोपचार, हृदयविकाराचा झटका आल्यास द्यावयाचा सीपीआर अर्थात कार्डिओ पल्मनरी रीससिटेशन म्हणजेच हृदयाचे पुनरुज्जीवन करणे, पूरपरिस्थितीत बचाव व शोध कार्य करणे यासारख्या विविध बाबींचा समावेश आहे. त्याचबरोबर आगीची घटना घडू नये किंवा विविध स्वरुपाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी घ्यावयाची खबरदारी; एखादी दुर्घटना घडल्यास त्यावेळी स्वतःची काळजी घेत करावयाचे मदतकार्य याबाबतही अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रासह ओळखपत्र देखील मान्यवरांच्या हस्ते देण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत मुंबईतील सुमारे ५७२ स्वयंसेवकांची ‘आपदा मित्र’ म्हणून निवडण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here