@maharashtracity

मुंबई: परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये (Global Hospital, Parel) कृत्रिम अवयवांच्या सहाय्याने चालू-फिरू शकणाऱ्या दोन वेगवेगळ्या रुग्णांवर दोन्ही हातांचे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया (two bilateral hand transplant) करण्यात आल्या.

दोन्ही हात-पाय गमावलेल्या रुग्णांवर दोन्ही हातांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडण्याची हात प्रत्यारोपणाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचा दावा ग्लोबल हॉस्पिटलकडून करण्यात आला आहे.

राजस्थानातील (Rajasthan) २२ वर्षीय होतकरू कबड्डी खेळाडू (Kabaddi Player) तर दुसरा पुण्यातील ३३ वर्षीय अकाऊटंट तरुण असल्याचे सागण्यात आले.

राजस्थानच्या खेड्यात राहणारा २२ वर्षांचा होतकरू कबड्डीपटू जगदेव सिंग याला जानेवारी २०२० मध्ये विजेचा धक्का बसला होता. यात झालेल्या गँगरीन व जंतूसंसर्गामुळे त्याचे दोन्ही हात आणि पाय कापून टाकावे लागले होते.

ज्या वर्षी जगदेव सिंग कबड्डी अकॅडमीमध्ये प्रवेश घेणार होता, त्याचवर्षी त्याला अपघातामध्ये हातपाय गमवावे लागले. मात्र १५ ऑक्टोबर २०२१ रोजी, दसऱ्याच्या दिवशी अहमदाबादमध्ये (Ahmadabad) एका व्यक्तीच्या हातांची एक जोडी अवयवदानामध्ये उपलब्ध होत असल्याचा फोन त्यांना हॉस्पिटलमधून आला.

Also Read: मुंबई महापालिकेची २० महिन्यांनंतर होणार पहिली प्रत्यक्ष सभा

प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ, हात व मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जन्स, ऑर्थोपेडिक सर्जन्स आणि अनेस्थेशियोलॉजिस्ट्स (anaesthetics) यांच्या एका मोठ्या पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (surgery) पार पाडली. तब्बल १३ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची स्थिती पूर्ववत होण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी फिजिशियन्स, इम्म्युनोलॉजिस्ट्स आणि परिचारकांकडून रुग्णावर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. सिंग याला कृत्रिमरित्या बसविलेल्या पायांवर पुन्हा एकदा उभे करण्यासाठी फिजिओथेरपिस्ट्सच्या एका पथकाने कष्ट घेतले.

आपल्या नव्याने बसविलेल्या हातांना सांभाळत कृत्रिम पायांवर उभे राहताना शरीराचा तोल सांभाळण्याचे आणि चालण्याचे तंत्र सिंग याला नव्याने शिकून घ्यावे लागणार होते.

तर दुसऱ्या बाजूला पुण्यातील ३२ वर्षीय रुग्ण प्रकाश शेलार यांनाही २०१९ च्या दिवाळीमध्ये विजेचा धक्का बसून झालेल्या अपघातामध्ये आपले हात-पाय गमवावे लागले होते. व्यवसायाने अकाउंटन्ट असलेले शेलार हे आपले आईवडील, पत्नी आणि ४ व २ वर्षांची दोन लहान मुले अशा सहा जणांच्या कुटुंबातील अर्थार्जन करणारे एकमेव सदस्य होते.

या दुःखद घटनेमुळे त्यांना नोकरी गमवावी लागली. त्यांची पत्नी आणि आई कुटुंबाला आधार देण्यासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी लहान-मोठी कामे करत आहेत. ९ महिन्यांपूर्वी त्यांनी डॉ. निलेश सातभाई (Dr Nilesh Satbhai) यांची भेट घेतली व हस्तप्रत्यारोपणासाठी प्राप्तकर्त्यांच्या प्रतीक्षायादीमध्ये शेलार यांनी नाव नोंदवले.

दिनांक ३० ऑक्टोबर २०२१ रोजी, दिवाळीच्या अगदी काही दिवस आधीच त्यांना सुरत (Surat) येथून अवयवदानाद्वारे हात उपलब्ध झाल्याची सूचना मिळाली आणि ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर दोन्ही हातांच्या प्रत्योरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

या दोन्ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे डॉ. निलेश सातभाई यांनी सांगितले की, हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया या गुंतागुंतीच्या असतात. प्राप्तकर्त्या रुग्णाचे अवयव किती प्रमाणात कापले गेले आहेत यानुसार ही गुंतागुंत कमी-जास्त होत असते.

हात व पाय दोन्ही गमावलेल्या रुग्णांवर दोन्ही हात बसविण्याची शस्त्रक्रिया करण्यामध्ये काही विशिष्ट आणि खडतर आव्हाने असतात. बहुतेकदा या रुग्णांच्या शारीरिक क्षमता कमकुवत झालेल्या असतात व हातांचे प्रत्यारोपण केल्यानंतर बदललेल्या शारीरिक स्थितीशी जुळवून घेणे त्यांना कठीण जाऊ शकते.

मात्र या दोन्ही रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर पूर्ववत होण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठीच्या प्रयत्नांत डॉक्टरांचे पथक यशस्वी ठरले असल्याचे डॉ. सातभाई म्हणाले.

यापूर्वी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऑगस्ट २०२० मध्ये मोनिका मोरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया ही पश्चिम भारतातील पहिली हात प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ठरली होता. ही शस्त्रक्रियादेखील डॉ. निलेश सातभाई यांच्या पथकाने केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here