@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC polls) तोंडावर आलेली असताना मुंबई उपनगर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा घेतला. या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वी राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास आणि शहर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनीही मंगळवारी महापालिका मुख्यलयात भेट देऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी, उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी, महापालिका क्षेत्रातील उपनगरांमध्ये असलेल्या विविध विभाग कार्यालयांमध्ये ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुयोग्यप्रकारे होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. मुंबई महापालिका (BMC) क्षेत्रातील विविध कामांच्या दृष्टीने राज्य शासनाच्या स्तरावर समन्वय साधण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधितांनी प्राधान्याने करावी, असे आदेश पालकमंत्री यांनी प्रशासनाला दिले.

या बैठकीदरम्यान पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल व चारही अतिरिक्त आयुक्त यांनी पालकमंत्री लोढा यांना, महापालिकेच्या विविध कामांची व प्रकल्पांची माहिती दिली. या बैठकीला, भाजपचे उत्तर मुंबई मतदार संघाचे खासदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेतील आमदार राजहंस सिंह, आ. विद्या ठाकूर, आ. डॉ. भारती लव्हेकर, आ. ऍड. पराग अळवणी आदी उपस्थित होते. त्याचबरोबर भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट आणि विनोद मिश्रा, योगीराज दाभाडकार हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी मुंबईतील रस्ते व पूल या संबंधीची विकास कामे, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा, मलजल प्रक्रिया केंद्रे इत्यादींबाबत तर अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी, विविध आरोग्य व वैद्यकीय सेवा-सुविधा, प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये इत्यादींबाबत माहिती दिली.

तसेच, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी सागरी किनारी रस्ता, उद्याने, मैदाने, माहिती तंत्रज्ञान विभाग, शिक्षण विभाग इत्यादींबाबत उपस्थितांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here