Twitter : @maharashtracity
पिंपरी, पुणे
शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार शिक्षणासाठी नावलौकिक मिळवलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांचा मलेशिया दौरा (Students of PCCO visited Malesia) आयोजित करण्यात आला होता. दोन आठवड्यांच्या कार्यानुभव दौऱ्यात (Industrial Visit – IV) डेटा विश्लेषण, अहवाल लेखन आणि सादरीकरण, आर्थिक व्यवस्थापन आणि अहवाल, वर्धित अक्षय ऊर्जा प्रणालींसाठी पॉवर इलेक्ट्रॉनिक्स एकत्रीकरण, कल्पना आणि नावीन्य, व्यावहारिक कार्यशाळा आणि प्रकल्प आदींचा तांत्रिक अभ्यास, सांस्कृतिक सहयोग तसेच प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन विविध विषयांची माहिती घेतली.
पीसीईटीच्या अंतर्गत पीसीसीओई आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, पेट्रोनास, मलेशिया यांच्यामध्ये झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारानुसार पीसीसीओईच्या दहा विद्यार्थ्यांनी दोन आठवड्यांच्या कार्यानुभव उपक्रमात सहभाग घेतला. पीसीईटी आणि पेट्रोनास युनिव्हर्सिटी यांच्या मध्ये २०२० मध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी संयुक्त पीएचडी पर्यवेक्षण, सह-शिक्षण, विद्यार्थी कार्यानुभव उपक्रम आदींचा समावेश होता. त्यानुसार हा दौरा आयोजित करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी कार्यानुभव सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. तेथील प्राध्यापक, विविध देशांतील विद्यार्थ्यांशी संवाद, चर्चा, प्रशासकीय अधिकारी, उद्योग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनामुळे भविष्यातील आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाचा विकास, वापर, उपयोगिता याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. या कार्यानुभवातून भविष्यातील वाटचालीसाठी उपयुक्त माहिती मिळाली. प्राप्त केलेली कौशल्ये आणि ज्ञान पीसीईटी, पीसीसीओई विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
पीसीसीओईच्या आंतरराष्ट्रीय संबंध, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रोशनी राऊत, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. सोनाली पाटील, सहाय्यक प्राध्यापक अनघा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा आयोजित करण्यात आला होता. पीसीसीओई विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्रात मलेशियात शिक्षणाची (सेमिस्टर एक्सचेंजच्या) संधी, तृतीय वर्षाच्या आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी संशोधन संलग्न कार्यक्रम यासारख्या अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.