@maharashtracity

महाड

युक्रेन आणि रशिया मध्ये चाललेल्या युद्धाचा संघर्ष तीव्र झाला असून या दोन्ही ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. महाडमधील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून ते सुखरूप असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील 22 विद्यार्थी युक्रेन, रशिया या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले होते. नुकतेच दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्याने या ठिकाणी असलेल्या नागरिकांना मायदेशी परत येण्याचे आवाहन भारताने केले होते. मात्र, तत्पूर्वी युद्ध शिगेला पोहोचल्याने अनेक विद्यार्थी युक्रेन आणि रशियामध्ये अडकले. यापैकी महाड तालुक्यातील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. युक्रेनची राजधानी कीव येथे हे तिन्ही विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती पालकांनी दिली.

महाडमधील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एजाज बिरादार यांचा मुलगा खुर्रम एजाज बिरादार तर भाचा शोएब मौलासाब पठाण आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख पद्माकर मोरे यांची मुलगी मुग्धा पद्माकर मोरे हे महाविद्यालयाच्या बंकरमध्ये सुखरूप असून व्हिडीओ कॉलिंगद्वारे पालकांशी संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे. युक्रेनमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बॉर्डरनजीक पोलंडजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अद्याप विमान सुविधा उपलब्ध नसल्याने जोपर्यंत हे विद्यार्थी भारतात पाऊल ठेवत नाही, तोपर्यंत पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here