X : @milindmane70

महाड – मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai – Goa National Highway) खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकचा मुलामा देण्याचे काम सध्या जोमाने सुरू आहे. हे पेव्हर ब्लॉक (Paver block) गणपती आगमनापर्यंत (Ganesh festival) व्यवस्थित राहतील का? असा प्रश्न या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहन चालकांसहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) गटाचे रायगड जिल्हा वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी उपस्थित केला आहे.

कोकणातील चाकरमान्यांनी सलग १७ वर्ष या महामार्गावरील खड्ड्यातून प्रवास केला आहे. तशीच परिस्थिती यावर्षी देखील या महामार्गाची झाली आहे. पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंत अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र हे कॉंक्रिटीकरणाचे (concrete road) काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी काँक्रिट केलेल्या रस्त्याला तडे गेले आहेत. लोणेरा, कोलाड व नागोठणे ते कासू व गडब, आमटेम या ठिकाणचा रस्ता अद्याप कॉंक्रिटीकरण झालेला नाही. त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात डांबरीकरण केल्याने त्या डांबरीकरणाची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे महामार्गावर जागोजागी वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यातच शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मुंबई, पुण्याकडून गावाकडे जाणाऱ्या असंख्य वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी होतेच, तशात एखादे अवजड वाहन बंद पडल्यास ते देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे.

गणरायाचे (Ganeshotsav) आगमन सात सप्टेंबर रोजी होत आहे. मात्र आठ दिवस अगोदर म्हणजे एक सप्टेंबर पासून कोकणात चाकरमान्यांची वर्दळ सुरू होते. त्यामुळे या महामार्गावर एसटी बस सह खाजगी बसेस व हजारो कार रस्त्यावर येतात. खड्ड्यांमुळे चाकरमान्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागणार असल्याने तात्पुरती मलमपट्टी म्हणून पेव्हर ब्लॉकने खड्डे भरण्याचा नामी उपाय राष्ट्रीय महामार्ग खात्याने अवलंबला आहे. त्यासाठी जागोजागी काम सुरू आहे. मात्र पेव्हर ब्लॉकने केलेला रस्ता एक महिन्यांनी येणाऱ्या गणेशोत्सवाकाळापर्यंत टिकून राहील का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

वाहनाच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने या महामार्गावरून होणारी ओव्हरलोड वाहतूक हे पेव्हर ब्लॉक सहन करतील का? असा सवाल सुभाष मोरे (Subhash More) यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. पूर्वीचा मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग डांबरीकरणाने तयार केलेला होता. त्या काळात वापरण्यात आलेले डांबर व आता वापरण्यात येत असलेले डांबर याच्यात खूप फरक आहे. आताच्या डांबराच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणावर तडजोड केली जात आहे. त्यामुळे पूर्वीचा इंदापूर आणि माणगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे डांबरीकरण अजून टिकून आहे.

जन आक्रोश समितीमार्फत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी २८ जुलै रोजी होम हवन केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जागे झाले. तरीही १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनापासून पुन्हा जन आक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणातील जनता या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत रस्त्यावर उतरणार आहे.

वाहतूक पोलिसांना डोकेदुखी! 

महामार्गाच्या दुरावस्थेमुळे वारंवार अवजड वाहने बंद पडून अथवा रस्त्याची साईड पट्टी मजबूत नसल्याने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला दररोज सामोरे जाताना महामार्ग वाहतूक पोलिसांची (Highway traffic police) डोकेदुखी वाढत आहे. कोकणात पडणाऱ्या अतिवृष्टीमुळे व वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पावसात भिजत वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न महामार्ग वाहतूक पोलिसांना दिवस-रात्र करावे लागत आहे. अनेक वाहतूक पोलिस पावसात भिजावे लागल्याने आजारी पडल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here