Twitter: @maharashtracity

अलिबाग: प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणात तसेच विविध प्रयोगातून शिक्षण घेता यावे, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शाळा डिजिटल मोबाईल करण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 2 हजार 603 शाळांपैकी 2 हजार 12 शाळा डिजिटल झाल्या असून, उर्वरित 591 शाळांमध्ये मोबाईलच्या (Digital School) माध्यमातून डिजिटल शिक्षण देण्यात येत आहे. या शाळाही टप्प्याटप्प्याने पूर्ण डिजिटल करण्याचा मानस, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील (ZP CEO Dr Kiran Patil) व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी व्यक्त केला आहे.

प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या भावी आयुष्याचा पाया असल्याने येथे मिळणारे शिक्षणही आधुनिकतेला धरून असणे अत्यावश्यक आहे. त्यातच खासगी शाळांची स्पर्धा जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे असल्यामुळे डिजिटल शाळा बनवण्याला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषद शाळा व ग्रामस्थही प्रयत्न करत आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत रायगड (Raigad) जिल्ह्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकही यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक शाळा सध्या डिजिटल बनल्या आहेत. शाळांतील विद्यार्थी स्मार्ट फोनच्या (smart phone) माध्यमातून गृहपाठ, अध्ययन करत आहेत.

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योजक, सामाजिक संस्थां यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. सामाजिक उत्तरदायित्वातून (CSR Fund) डिजिटल शाळांसाठी त्यांनी मदत करीत गावागावातील शाळा डिजिटल केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here