X : @milindmane70

महाड : महाड – रायगड मार्गावर लाडवली गावाजवळील नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत (underconstruction bridge) असल्याने काढलेल्या पर्यायी मार्गावर पाणी आले. त्यामुळे हा पर्यायी मार्ग सलग अठरा तास बंद आहे. तरीदेखील प्रशासनाने यावर कोणतीच उपाय योजना न केल्याने २५ गावांचा संपर्क तुटला आहे. राष्ट्रीय महामार्ग खाते (National Highway authotity) झोपी गेल्याचे चित्र असून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कोणत्याही वेळी रायगड मार्गावर आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

महाड – रायगड रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. जागोजागी अर्धवट अवस्थेत ठेवलेल्या या कामामुळे आधीच रायगडकडे (Raigad) जाणाऱ्या 25 गावातील ग्रामस्थांना दररोज खड्ड्यातून व अपघातांचा सामना करीत अंतर पार करावे लागत आहे. लाडवलीजवळील मांडले नदीवरील पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत असल्याने पर्यायी रस्ता (diversion road) तयार करण्यात आला. मात्र रायगड खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघता मोठ्या प्रमाणावर पाणी साचून हा रस्ता बंद झाल्याच्या घटना आजपर्यंत सहा ते सात वेळा घडल्या आहेत.

महाड तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस (Heavy rain) पडत आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे लाडवली येथील पर्यायी मार्गावर शुक्रवारी दुपारपासूनच पाणी साचल्याने हा महामार्ग बंद झाला आहे. या घटनेला १८ तासापेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्याने व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी  पर्यायी व्यवस्थेबाबत ग्रामस्थांशी व स्थानिक नागरिकांची चर्चा केली नाही. त्यामुळे त्यांना या पाण्यातूनच धोकादायक परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करावे लागत आहे.

महाड तालुक्यात कालपर्यंत १२० मिलिमीटर पर्यंत पावसाची नोंद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तर एकूण पाऊस ११०० मिलिमीटर पर्यंत पडला आहे. शुक्रवार पासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी,नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साठल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatraopati Shivaji Maharaj) राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडकडे (Raigad fort) जाणारा रस्ता सलग अठरा तास बंद असतानाही प्रशासन झोपी गेले आहे. स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले असून राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात शिव्यांची लाखोली वाहत आहेत. ग्रामस्थांचा रुद्रावतार पाहून राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी या ठिकाणी तोंड देखील दाखवत नसल्याने २५ गावातील नागरिकांचा तब्बल १८ तास संपर्क तुटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here