#७३ पैकी ५१ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक होणार!
By मिलिंद माने
Twitter: @milindmane70
महाड: महाड तालुक्यातील ७३ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी ७३ पैकी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ५१ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका अटळ आहेत.
महाड तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayat elections) जाहीर झाल्या होत्या. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी २१७ तर सदस्य पदासाठी ९६१ अर्ज दाखल झाले होते. काल मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून ५१ ग्रामपंचायत मध्ये निवडणुका होणार आहेत.
महाड (Mahad) तालुक्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची याप्रमाणे : खुटील, कोंझर, पूनाडे तर्फे नाते, वाळण खुर्द, दादली, नागाव, पिंपळवाडी, रूपवली, मोहत, निगडे, दापोली, राजीवली, कुर्ले, चिंभावे मोहल्ला, पाचाड, रावतळी, शिरसवणे, वडवली, केंबुर्ली, फाळकेवाडी, चांभार खिंड, कुंबळे. या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, कुंबळे आणि फाळकेवडी या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी उमेदवारी अर्जच दाखल झाले नाहीत.
महाड तालुक्यात सरपंच पदासाठी ७३ ग्रामपंचायत मधून २१७ जणांनी उमेदवारी अर्ज भरला होते. तर सदस्य पदांसाठी ९६१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी २१७ पैकी ९७ लोकांनी माघार घेतली. सदस्य पदासाठी ९६१ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २२६ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. सद्यस्थितीत सरपंच पदासाठी १२० जण तर सदस्य पदासाठी ७३५ जण नशीब आजमावत आहेत.