@maharashtracity

महाड: महाडमध्ये गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पावसाचा जोर कायम आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडणे टाळले आहे. कधी ऊन, कधी रिमझीम पाऊस अशी गेली महिनाभर महाड तालुक्याची परिस्थिती असताना गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात संपूर्ण महाड तालुक्याला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे संपूर्ण परिसरात तसेच महामार्गावर ठीकठिकाणी पाण्याची डबकी तुंबली आहे.

महाड तालुक्यात सध्या भात शेतीस सुरवात झाली असून या पावसामुळे या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून शेताच्या बांधाने वाहू लागले आहे. पासवणारी भात शेती काही दिवसातच कापणीसाठी तयार होणार असल्याने या पावसामुळे ही शेती अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

दरवर्षी, महाड तालुक्यात लागणाऱ्या पावसापेक्षा यंदा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पाच महिने सुरू असलेला पाऊस अद्याप थांबण्याचा नाव घेत नाही. महाड तालुक्यात भात पिकासोबत मोठ्या प्रमाणात कडधान्याचीदेखील शेती केली जाते. खाडी पट्टयाला कडधान्याचे कोठार म्हटले जाते. कडधान्याच्या पिकापासून देखील शेतकरी वर्गाला आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, या पावसामुळे शेतात पाणी तुंबून राहिले तर कडधान्याची पेरणी किंवा ठोकणी वेळेवर करता येणार नाही, याचा देखील शेतकरी वर्गाला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महाड तालुक्यात पावसाचा जोर वाढला असताना दुसरीकडे शेतामधील धान्य कापणीला आले असताना रानडुक्कर, मोर व वानर यांनी हैदोस मांडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे अमाप नुकसान या वन्यप्राण्यांनी केले असताना शेतकरी हतबल आहे. तर दुसरीकडे शेतावर अनेक ठिकाणी करप्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, कृषी खाते यावर उपाय काय करावा याबाबत कोणतीही कल्पना शेतकऱ्यांना देत नसल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here