माकडाला खाऊ घालण्याच्या प्रयत्नात गेला तोल
Twitter: @maharashtracity
महाड: रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महाड- भोर- पुणे रस्त्यावरील वरंध घाटात मंडणगड तालुक्यातील एक शिक्षक माकडाला खाऊ घालण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन चारशे फूट दरीत कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला.
वरंध घाटातील वाघजाई देवीच्या मंदिरासमोर एक लाल रंगाच्या फोर्ड फिगो गाडीतून हे शिक्षक आले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. वरंध घाटात असणाऱ्या माकडांना खाऊ घालण्याच्या नादात त्यांचा तोल जाऊन ते 400 फूट दरीत कोसळले. या व्यतिरिक्त कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. त्यानंतर बचाव पथकाद्वारे तातडीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. परंतु, दरी खूप खोल असल्याने व सायंकाळचा काळोख झाल्याने शोधकार्यात अडचण येत होती.
बुधवार दिनांक 4 जानेवारीला पहाटे ३ वाजेच्या सुमारास जवळजवळ 380 फूट खोल दरीत ते मृत अवस्थेत सापडले. त्यांचे नाव अब्दुल खुदोबुद्दीन शेख (वय वर्ष 41) असून ते मूळचे राहणार एरंडी, लातूर असल्याचे समजले. सध्या ते रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
वरंध घाटात माकडाला खाऊ घालताना त्यांचा पाय घसरून दरीत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता समोर येत आहे. महाड तालुक्यातील पारमाची गावचे ग्रामस्थ बबन मालुसरे, महाड आपदामित्र अमिताभ जाधव, सिस्कॅपचे चिंतन वैष्णव यांनी दरीच्या खालच्या बाजूस जाऊन मृतदेहाचा शोध घेतला.
त्यांनतर सिसकॅप संस्था, नागरी संरक्षण दल,
अपदामित्र, साळुंखे रेसक्यू टीम, अँडवेंचर सोल ग्रुप, सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्या अथक प्रयत्नाने पहाटे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांच्या मदतीने मृतदेह भोर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
यावेळी घटनास्थळी भोर तालुक्याचे तहसीलदार मोहन पाटील, अजिनाथ गाजरे, पोलीस प्रशासन, तैनात असलेली बचावपथके आणि ग्रामस्थ मदतीसाठी उपस्थित होते.