९१३ कोटींच्या कामात अनेक ठेकेदारांना ५० पेक्षा जास्त कामे?

By Milind Mane

Twitter: @milindmane70

मुंबई: रायगड जिल्हा परिषदेने (Raigad ZP) तब्बल 913 कोटी 38 लाख रुपयांच्या 1405 जलजीवन योजना मंजुरीची ई-निविदा प्रक्रियेची माहिती कोणत्याही वर्तमान पत्रात प्रसिद्ध न करताच राबवण्यात आल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिली आहे. याबाबतची तक्रार सावंत यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली असून जल जीवन मिशनची (Jal Jeevan Mission) निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत व केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग तथा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना पत्र पाठवून केली आहे. 

यामध्ये एकेका ठेकेदाराला ५० कोटी रुपयांहून अधिक म्हणजेच सुमारे १०० कोटींची कामे देण्यात आली आहेत. तसेच रायगड जिल्हा परिषदेने 913 कोटी 38 लाख रुपयांच्या निविदांची प्रसिद्धी ई-कार्यप्रणाली अंतर्गत वर्तमानपत्रात केली नसल्याने या निविदा रद्द करण्याची मागणी संजय सावंत यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली आहे.

रायगड जिल्हा परिषदेने नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत केलेल्या या कामाबाबत सावंत यांनी काही उदाहरणे दिली आहेत. जी.डी. मोहिते कन्स्ट्रक्शन यांना ५७ कामे, अरविंद धोंडू पाशीलकर यांना ५५ कामे, डी. के.कन्स्ट्रक्शन यांना ३६ कामे, विवेक रोहिदास पाटील २१ कामे व राज एंटरप्राइजेस विजय साळुंखे यांना २० कामे मिळाली आहेत. ठेकेदारांच्या कामांची यादी रायगड जिल्हा परिषदेने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. 

रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात ९३ कामांपैकी 57 कामे एकाच ठेकेदाराला मंजूर झाली आहेत. याबाबतही सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अलिबाग तालुक्यात सासवणे या गावात 2021 मध्ये एक व 2023 मध्ये एक, अशा दोन योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.

कार्यारंभ आदेश देऊनही दोन वर्षात कामास सुरुवात नाही

त्याचप्रमाणे जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा योजनांचे प्रत्येक ठेकेदारास ५० च्या वर कामे दिली जात असून, त्यामुळे कामाचा दर्जा खालावणे व कामे वेळेत पूर्ण न होण्याचा धोका असल्याच्या बाबी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी कार्यारंभ आदेश दिलेल्या ठिकाणी अद्याप कामेच सुरू झालेली नाहीत.

केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून होणाऱ्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) व जिल्हा परिषदांच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील कामे अचानकपणे वाढली आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा (Rural Water Supply Scheme) विभागाची वर्षाला ५० ते १०० कोटींची कामे करण्याची क्षमता असताना या योजनेमुळे अचानकपणे वर्षाला हजार ते दोन हजार कोटींची कामे करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे.

ठेकेदारांना आर्थिक क्षमतेपेक्षा जास्त कामे

ठेकेदारांची संख्या ठराविक व कामांची संख्या अधिक यामुळे रिंग होऊन एकेका ठेकेदाराला वीस पेक्षा जास्त कामे मिळाली आहेत. या ठेकेदारांना त्यांच्या आर्थिक क्षमतेपेक्षाही जास्त कामे दिली गेली असून बऱ्याच ठेकेदारांनी खोटी कागदपत्रेही सादर केल्याची चर्चा रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा खात्यामध्ये ऐकण्यास मिळत आहे

याबाबत वरिष्ठ पातळीवरून दबाव असल्याचे कारण सांगत तांत्रिक बाबींना फाटा देत प्रशासकीय मान्यता देणे, टेंडरप्रक्रिया राबवणे व कार्यारंभ आदेश देण्यालाच प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.

एकेका ठेकेदाराला एवढी कामे दिल्यानंतर त्यांच्या दर्जाचे काय होणार? क्षमतेच्या पलिकडे कामे असल्यास ठेकेदार ती वेळेत पूर्ण कशी करणार आणि कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

ठेकेदारांचे आपसात साटेलोटे

त्यामुळे 913 कोटी 38 लाख रुपयांच्या कामाचे वाटप ठराविक ठेकेदारांनी आपसात करुन घेतले असुन यामुळे सुशिक्षित बेरोजगार व इतर छोट्या ठेकेदारांवर ही निविदा प्रक्रिया अन्याय करणारी ठरली आहे. यामुळे हि निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी संजय सावंत (RTI Activist Sanjay Sawant) यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग तथा जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना पत्र पाठवून केली आहे.

प्रभारी अधिकाऱ्याने काढली १६१ कोटींची बिले

रायगड जिल्हा परिषदेमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार गेली सहा वर्षे उप अभियंता यांच्याकडे आहे. शासन जाणीवपूर्वक हे पद भरत नसल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्याचे ठेकेदारांसोबत हितसंबध निर्माण झाले असून या अधिकाऱ्याने गेल्या तीन वर्षात 161 कोटी रूपयांची बीले काढली आहेत. त्यामुळे सन 2018 ते 2023 पर्यंत प्रभारी कार्यभार असणाऱ्या अधिकाऱ्याने काढलेल्या बीलांचे ऑडीट करण्याची मागणीही सावंत यांनी केंद्रीय मंत्री यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here