लस खरी की खोटी अद्यापही गुलदस्त्यात
मुंबई: कांदीवली येथील हिरानंदिनी सोसायटीमध्ये ३० मे रोजी पार पडलेल्या बोगस लसीकरणासाठी वापरण्यात आलेल्या लसीची बॅच ही गुजरात, दिव व दमण येथील नागरिकांसाठी पाठविण्यात आली होती, अशी माहिती पुणे येथील ‘सिरम इन्स्टिट्यूट’ने मुंबई महापालिकेला पाठवलेल्या पत्रामधून समोर आली आहे.
मात्र हिरानंदानीमध्ये रहिवाशांना दिलेली लस खरी की खोटी होती, याचा उलगडा अद्याप शकलेला नाही.
यासंदर्भातील माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
सिरम इन्स्टिट्यूटने पाठवलेली माहिती, अधिक तपासासाठी पोलिसांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कांदिवली, हिरानंदानी सोसायटीमध्ये ३० मे रोजी खासगी लोकांनी लसीकरण मोहीम राबवली. यावेळी, सोसायटीमधील ३९० लोकांना प्रत्येकी १,२६० रुपये घेऊन लस देण्यात आली होती. मात्र लस घेतल्यानंतर कोणालाही कोणताच त्रास न झाल्याने बोगस लसीकरणाचा (fake vaccination) प्रकार समोर आला. त्यामुळे पालिकेने सदर लसींची बॅच नेमकी कुठून आली, तिचा पुरवठा कुठे करण्यात आलेला होता, याबाबत माहिती देण्यासाठी पुणे सिरम इन्स्टिट्यूटला मुंबईतील त्या लसीचा बॅच नंबर व तसे पत्र पाठवले होते.
लसीची बॅच ही खरेतर गुजरात आणि दिव दमण येथे पाठवल्याची माहिती मुंबई महापालिकेला पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटने पाठवलेल्या पत्रातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पुढील तपासासाठी ही माहिती पोलिसांना दिली जाणार असून त्यानुसार आता पोलीस पुढील तपास करतील. मात्र त्या बॅचचा जरी तपास लागलेला असला तरी लसीकरणासाठी वापरलेली लस खरी की खोटी हे समोर आलेले नाही.