By Vijay Sakhalkar
@maharashtracity
मस्तानचा तस्करी एका हवालदारानं सहा- सहा तगड्या माणसांना लोळवून लुटल्यानंतर त्याचा पत्ता शोधून काढण्याच्या प्रयत्नात गुप्तचर यंत्रणाच मस्तानच्या हाताशी उभी होत गेली. त्या यंत्रणेचा वापर पुढे मस्तान आपले तस्करी साम्राज्य बिनतोड उभे करण्यासाठी करू लागला. मस्तानची ही यंत्रणा काय तोडीची होती याचा एक किस्सा वाचण्यासारखा आहे.
मस्तानकडे (Haji Mastan) अनेक कॅरियर्स (carriers) होते. त्यांना तावून सुलाखून घेतले होते आणि गद्दारी कधी मनाला शिवणार नाही इतकी बिदागी त्यांना एका कॅरिइंगसाठी दिली जायची. त्याचा एक कॅरियर एकदा मस्तानच्या सांगण्यावरून कर्नाटकात (Karnataka) गेला होता. पण तीन दिवसानंतर माल ज्याच्यापर्यंत पोहोचावयाचा होता त्याचा मस्तानला फोन आला. माल पोहोचला नसल्याचे कळताच मस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यानं दुसरा कॅरियर तयार केला व संध्याकाळी निघणार तोच फोन आला. माल पोचला.
मग मस्तानच्या मनात शंका आली….गंडवायचं असतं तर त्यानं माल पोहोचविलाच नसता. तीन दिवस उशिरा का पोहोचवला?
माल पोहोचविल्यानंतर मस्तानचा कॅरियर मुंबईत आला. मस्तान त्याला काहीच बोलला नाही. दुसऱ्या वेळीही हाच प्रकार झाला. मस्तान काहीच बोलला नाही. तिसऱ्या वेळी मात्र कॅरियर परतलाच नाही. आता मात्र मस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याला असेल तेथून हुडकून आणण्याची ऑर्डर मस्ताननं काढली.
दोन दिवसात त्याला हैदराबादच्या (Hyderabad) एका गल्लीतून शोधून आणून मस्तानसमोर उभं करण्यात आलं. मस्तानसमोर उभं करताक्षणी त्याच्या डोळ्यातून गंगाजमुना वाहायला लागल्या. त्यानं माल खाल्ल्यांची कबुली दिली.
कारण सांगितलं……. आईला असाध्य आजार आहे. तिच्यावरील उपचारासाठी फार फार खर्च येतो. आता तर तिला हाॅस्पिटलात (Hospital) ठेवली आहे. त्यामुळे खर्च दुप्पट वाढला आहे. त्यामुळे इच्छा झाली …लांबवला माल तर बाबा काय करणार आहे? (मस्तानला बाबा या नावानंही ओळखलं जात असे) केलं. तरी त्यावेळचं त्यावेळी पाहू……
मस्तान एखाद्याला तडी द्यायची असेल तर ‘डोस’ हा शब्द वापरत असे. तीन दिवस त्या करियरला सारखा ‘डोस’ दिला जात होता. तीन दिवसांनंतर त्याला पुन्हा मस्तानसमोर आणलं गेलं. मस्ताननं त्याला कसं वाटतंय म्हणून विचारलं… त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते.
मस्तानंनं त्याच्या हाती पुडकं सोपवलं. सांगितलं… “फिकर मत करना…. हर महिना पैसे आते रहेंगे… और माँ की बीमारी दूर हो जानेके बादही तुम मुंबई आना.”
त्यानं मस्तानचे पाय धरले.
पाव खुदा के पकडना और माँ ही खुदा होती है…. जाओ माँ की सेवा करो…. लेकिन माँ अभी वह पुराने खचडू हाॅस्पिटलमे नही है…. उसे बडे हाॅस्पिटल मे रखा है….. और बिल की परैशानी लेना नही। तुम्हारे पास कोई बिल मांगे तो उस के दिन भर गये समझो….
मस्तान त्याची सर्व माहिती मिळवत होता. पण जेव्हा तो नेटवर्कच्या बाहेर गेला तेव्हा मस्ताननं त्याला उचलून आणण्याचा हुकूम सोडला. त्यानं जी हकिकत सांगितली ती खरी की खोटी हे तपासून पाहिलं. त्याच्या आईला चांगल्या हाॅस्पिटलात हलवलं. तिच्या उपचाराचा खर्च उचलला आणि एकाला तिच्या सेवेसाठी थांबण्याचा सल्ला दिला.
ही मस्तानची गुप्तचर यंत्रणा (secret service) त्याला प्रत्येक बाबतीत उपयोगी पडत राहिली. याच यंत्रणेने त्याला मुंबई – पुण्यापासूनच्या (Mumbai – Pune) सर्व गुंड टोळ्यांशी जवळीक साधून दिली. त्या काळातल्या टोळ्यांची रचना वेगळी होती. त्या- त्या टोळ्यांची कार्यक्षेत्रे ठरलेली होती. एक टोळी दुसऱ्या टोळीच्या कार्यक्षेत्रात घुसत नसे. पण आपल्या कार्यक्षेत्रात आलेल्या कोणत्याही आगंतुकाला सोडत नसे.
त्या काळात गुंड टोळ्यांचा आणि टोळीनायकांचा आजच्या इतका जबर संघर्ष नव्हता. मात्र, तस्करी (smuggling) माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारा गाडा अपघातानं उलटलाय किंवा कोणत्याही कारणानं थांबला आहे, अथवा माल चाललाय हे लक्षात आलं तर गुंडांची पोरं खुशाल लुटालूट करीत.
ही लूट टाळण्यासाठी मस्ताननं त्या काळातील बहुतेक दाखलेबाजांना आणि दादांना गाठून साटेलोटे केले. आजच्यासारखे त्या काळात ‘भाई’ म्हणून संबोधले जात नसे. तर दादा म्हणूनच म्हटले जात असे. मस्ताननं या सगळ्या दादांना ‘चुन चुन के’ शोधले आणि त्यांची एकगठ्ठा मैत्री मिळवली.
या सर्व दादांना दरमहा काही बिदागी दिली जात होती आणि त्या बदल्यात त्यांच्या कार्यक्षेत्रातून तस्करी माल विनाअडथळा जाऊ देण्याचा अलिखित करार केला. तो करार आजही पाळला जातो असं मानलं जातं. पण टोळ्या भरपूर झाल्या आणि गाॅडफादरही (Godfather) खूप झाले.
(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकारिता असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वार्तांकन केले आहे.)