By विजय साखळकर
@maharashtracity
दाऊदचा उदय साधारणत: १९७७-७८ च्या सुमारास झाला. हाजी मस्तान (Haji Mastan), युसूफ पटेल यांच्यातील संघर्ष संपला होता. हाजी मस्तानच्या सांगण्यावरून करीम लालानं (Karim Lala) अफगाणिस्तानातून (Afganistan) मारेकरी आणून युसुफ पटेल (Yusuf Patel) याला गोळ्या घातल्याचा दावा केला गेला होता. पण एक अख्यायिका असे सागते की एके दिवशी युसूफ पटेल थेट हाजी मस्तानच्या घरी गेला आणि त्यानं मस्तानला सांगितले की, तू मी मित्र आहोत. माझी चूक झाली असेल तर हे रिव्हाॅल्वर घे आणि मला शिक्षा दे. याच्या त्याच्या हातून मला का मारतोस…. त्यानंतर दोघांमध्ये समेट झाला. दोघांनीही पार्ट़नरशिप तोडायची. स्वतंत्र व्यवसाय करायचे, एकमेकांच्या खबरा पोलिसांना द्यायच्या नाहीत. एकमेकांच्या शागिर्दांवर हल्ले करायचे नाहीत. या अटी परस्परांनी मान्य केल्या आणि समेट झाला.
असेही म्हटले जाते की त्या काळात खाजगीत बोलताना युसूफ पटेलनं म्हटलं होतं…. मी माझ्या छातीतून मस्तानची गोळी कधीच काढून टाकली आहे. त्यावेळी आजच्या इतक्या पत्रकारांच्या नजरा अंडरवर्ल्डवर (Mumbai Underworld) केंद्रीत नसत. त्यामुळे बातमी म्हणून ही गोष्ट प्रकाशित झाली नाही.
हाजी मस्ताननं नंतरच्या काळात म्हणजे आणीबाणीत (Emergency) जप्त झालेली मालमत्ता परत देण्याचा न्यायालयीन निकाल आल्यानंतर आपलं चरित्र लिहिण्यासाठी एका नवोदित पत्रकारावर जबाबदारी सोपवली होती. पुढे मस्तानला कुणी तरी सांगितले की असं लिहिलंस तर तो कबुलीजबाब मानला जाऊ शकतो. त्यानंतर मस्ताननं आत्मचरित्राचे लेखन गुंडाळले.
रीतसर तस्करी सोडल्याची शपथ घेतल्यानंतरच्या काळात दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) हा हाजी मस्तानच्या संपर्कात आला होता असं म्हटलं जातं. काहींनी तर छातीठोकपणे दाऊदनं हाजी मस्तानला काही लाखांना चुना लावल्याचं लिहिलं आहे. पण गुन्हेगारी वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार इब्राहिम कासकर (Ibrahim Kaskar) यांचा गुन्हेगारी वर्तुळात अतिशय दबदबा होता. पोलीस अधिकाऱ्यांचा तो अत्यंत आवडता हवालदार होता. सर्वच बडे गुन्हेगार त्याला मान देत. त्यातून तो या बड्या मंडळींच्या संपर्कात आला असावा. करीम लाला आणि त्याचा पुतण्या समद खान यांच्याकडेही दाऊदचं जाणं-येणं असायचं.
त्या काळातील आणखी एक कॅरॅक्टर जेनाबाई चावलवाली (Jenabai Chawalwali) ही देखील सर्व बड्या गुन्हेगारांच्या संपर्कात होती. जेनाबाई मूळची गुजरातेतील (Gujrat). तिचा नवरा ऐतखाऊ आणि तिला मारझोड करे. पदरात दोन मुली. त्यांच्यासह तिची आबाळ होत असायची. म्हणून जगण्यासाठी ती मुंबईत (Mumbai) आली. दोन टाकी परिसरात ती रस्त्यावर तांदूळ विकत बसायची. त्यावेळी तांदळावर निर्बंध होते. तांदूळ काळ्या भावानं विकला जात असे. साहजिकच जेनाबाई ब्लॅकलिस्टला गेली. तिला तांदूळ विकण्यास पोलिसांनी मनाई केली.
असं म्हटलं जातं की यातूनच तिची भेट हवालदार इब्राहिम कासकरशी झाली. तिची यातनामय कहाणी ऐकून त्यानं तिला सपोर्ट केला. हवालदार कासकर यानं आश्रय दिल्यावर तिच्यामागचं शुक्लकाष्ट संपलं आणि ती राजरोस तांदूळ विकण्याचा व्यवसाय करू लागली. हवालदार कासकरच्या शब्दाला पोलीस दलात वजन असल्याचं तिला उमगलं आणि त्यातून ती बारीक सारीक गुन्ह्यांतील गुन्हेगारांची मध्यस्ती करू लागली. हे छोटे गुन्हेगार पुढे बडे होतात. त्यामुळे आपल्या कारकिर्दीतील या महत्त्वाच्या घटकाला विसरत नाहीत. त्यामुळे नकळत तिचाही दबदबा वाढत गेला. जेनाबाई चावलवाली म्हणून ती प्रख्यात झाली.
जेनाबाई चावलवाली आणि तिच्या संदर्भात हा सगळा मजकूर लिहिण्याचं कारण एवढंच की एकदा (तो तपशील पुढे येईल.) मुंबईतील हाताबाहेर जाणारं गॅंगवार (Gangwar) तिच्या मध्यस्थीनं थांबलं……काही काळ…पुन्हा ते भडकलं, त्यावेळी ते कुणीच थोपवू शकलं नाही.
दाऊद आणि शब्बीर हे दोघे भाऊ. दोघंही जेनाबाई चावलवालीचा आदर करायचे. दाऊद आणि शब्बीर हाताबाहेर चालले असल्याचं जेव्हा हवालदार कासकरच्या लक्षात आलं, त्यावेळी त्यांना जरा समजुतीच्या चार गोष्टी सांगण्यासाठी हवालदार कासकरनं दोघांनाही तिच्या हवाली केलं. ते तिचा प्रचंड आदर करीत.
दाऊद आणि त्याचा भाऊ शब्बीर यांच्या खिशात कोऱ्या करकरीत नोटा सापडल्यानं हवालदार कासकर व्यथित झाला. त्या नोटांवरील नंबर नुकत्याच बॅंकेची व्हॅन लुटली गेली होती, त्यातील नोटांशी मिळते जुळते असल्याचं हवालदार कासकरच्या लक्षात आलं व त्यानं दोघांनाही पोलिसांच्या हवाली केलं….
हा दाऊदचा उदय होता.
(लेखक विजय साखळकर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी अनेक वर्षे गुन्हेगारी जगताचे वृत्तांकन केले आहे.)