@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात अधिकारी पदावर कार्यरत प्रांजली भोसले यांनी काही गरजू नागरिकांना पालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी २७ लाख रुपयांना गंडा घातल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पालिका शिक्षण विभागाचे सह आयुक्त आशुतोष सलील यांनी, प्रांजली भोसले यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. त्यासंदर्भातील आदेश त्यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसारच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

प्रांजली भोसले यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व काही बेरोजगार नागरिकांना पालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २ कोटी २७ लाख रुपये उकळले आणि या कामात त्यांना मदत करणारे त्यांचे पती लक्ष्मण भोसले, दिर राजेश भोसले, महेंद्र भोसले यांच्यासह पळ काढला होता.

प्रांजली व त्यांचे पती लक्ष्मण भोसले यांना पोलिसांनी गोवा येथून ताब्यात घेऊन अटक केली. तसेच, त्यांच्या आणखीन दोघा साथीदारांही पोलिसांनी अटक केली आहे.

प्रांजली यांनी, नोकरी शोधणाऱ्या काही नागरिकांना त्यांच्या शैक्षणिक योग्यतेनुसार पालिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्यांनी गरजू नागरिकांकडून त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांची ऑनलाइन मुलाखतही घेतली होती. त्यानंतर प्रांजली यांनी २०१९ पासून कामावर जाणे बंद केले होते. नंतर पतीसह २०२० ला गोवा येथे पळ काढून बस्तान टाकले होते. दरम्यान, पालिकेने त्यांना नोटीस पाठवली होती मात्र त्यास कोणतही प्रतिसाद मिळाला नव्हता.

याप्रकरणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी नवघर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसानी तपास सुरू केला होता. मात्र प्रांजल भोसले यांचा व त्यांच्या साथीदारांचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर ते गोवा येथे असल्याची खबर मिळताच पोलिसांनी त्यांना गोवा येथूनच ताब्यात घेऊन अटक केली. तसेच, पोलिसांनी त्यांच्या दोन दाथीदारांपैकी एकाला ठाणे येथून तर दुसऱ्याला कल्याण येथून ताब्यात घेऊन अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here